मुंबई : आपला पक्ष सर्व धर्मियांचा आदर करतो, उगीच भलते सलते बोलू नका. पक्षाच्या चाकोरीत काम करा, अन्यथा मला पक्षाध्यक्ष म्हणून कठोर भूमिका घ्यावी लागेल, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकारी यांना दिली. मंगळवारी पक्षाची मासिक बैठक वरळी येथील एनएससीआय स्टेडियम येथे पार पडली. बैठकीला मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांची उपस्थित होती.राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची ३२ हजार कोटीची भरपाई आज मंजुर झाली आहे. याची माहिती गावागावात पोचली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. बहुतांश ठिकाणी आपल्याला महायुतीत लढायचे आहे. तोंडाला येईल ते बोलू नका. पक्षाची शिस्त मोडू नका, अशा कानपिचक्या त्यांनी उपस्थित नेत्यांना दिल्या

पक्षाने कार्यकर्त्यांसंदर्भात ॲप बनवले आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या कामाची अचूक मूल्यमापन होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार असून तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ असेल. जिल्हावार पक्ष प्रतिनिधी नेमून पक्ष संघटनसंदर्भातील माहिती घेतली जाणार आहे. ८ नोव्हेंबर पर्यंत त्यासदंर्भातले अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

अहिल्यानगर शहरचे पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लीमव्देषी भूमिका घेतल्याबद्दल अजित पवार यांनी बैठकीत जोरदार कान उपटले. पक्षाच्या चाकोरीत राहा, अन्यथा मला कठोर निर्णय घ्यावा लागेल, अशी तंबी त्यांनी जगताप यांना नाव न घेता दिली.

मतदार याद्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात अजित पवार म्हणाले, दुबार मतदारांचा प्रश्न आजचा नाही, वर्षानुवर्षे दोन ठिकाणी मतदान नागरिक करत आहेत. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उपस्थितांना विविध प्रश्न विचारण्याची मोकळीक बैठकीत दिली होती.

इतरांनी नाक खुपसू नये :

हिंदुत्वावादी संघटनांनी जगताप यांना पाठिंबा दिला असून त्यांना पक्षाने मंत्री करावे, अशी मागणी केल्याविषयी पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, मी माझा पक्ष चालवतो, इतरांनी माझ्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही. पक्षात इतरांची ढवळाढवळ आपण खपवून घेत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

खोडके यांचे वजन वाढले :

प्रदेशाध्यक्ष पदाची तुल्यबळ अशा पक्षसंघटक पदाची घोषणा  अजित पवार यांनी केली. हे पद पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके (अमरावती) यांना देण्यात आले आहे. पक्षाच्या आघाडीच्या विविध संघटना आणि मंत्री, आमदार व खासदार यांच्यात समन्वय ठेवून पक्षाध्यक्षांना सल्ला देणे,  अशी खोडके यांच्यावर जबाबदारी असणार आहे.