मुंबई : अमली पदार्थांच्या टोळीत तिघा आरोपींवर वांद्रे येथील अमली पदार्थ विरोधी कक्षाने नव्या मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अमली पदार्थांची तस्करी, विक्रीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राज्य शासनाने कडक पाऊल उचलली आहेत. त्यानुसार राज्यभर अमली पदार्थविरोधातील कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी तस्करांविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी जुलै २०२५ मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली होती.

राज्यातील पहिला गुन्हा

वांद्रे येथील अमली पदार्थ विरोधी कक्षाने अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या जमीर अहमद अब्दुल खालीद अन्सारी उर्फ बोका याच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल केला होता. जमीर उर्फ बोका नवनवीन टोळ्या बनवून अमली पदार्थांचा पुरवठा आणि विक्री करीत होता. स्थानिक पातळीवर त्याचा व्यवहार सुरू होता.

नवीन मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांनी जमीर उर्फ बोका, तसेच त्याचे दोन साथीदार अदनान आमीर शेख आणि कायनात जब्बार शेख यांच्याविरोधात कलम ३ (१), ३ (२), ३ (४) आणि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीचा सुत्रधार जमीर उर्फ बोका फरार असला तरी त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यात कायनात नावाच्या महिलेचा समावेश आहे. टोळीच्या सूत्रधाराला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात मोक्काच्या सुधारीत कायद्यानुसार राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.