कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी हा दावा केला. शिवसेना आणि भाजपा दोघेही आपआपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. आम्ही शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? झालाच तर फडणवीसांना बाजुला करून अमित शाह यांच्या विश्वासातील चंद्रकांत दादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात येईल का? की सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेल्या नितीन गडकरींना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

सोनिया गांधींनी फेटाळली शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापनेची स्वप्न पाहत आहे. पण असे घडण्याची शक्यता फार कमी आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसंबंधी पाठिंबा देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही तसेच आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे हे स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार नाही.

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असे एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांचे पाठिंबा देण्याबद्दल वेगळे मत आहे. शरद पवार पाठिंबा देण्यासाठी तयार झाले तरी सोनिया गांधी होकार देण्याची शक्यता नाही.