मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या धरपकडीचे सत्र सुरू असून तिकीट तपासनीसाला चुकविण्यासाठी विनातिकीट प्रवाशांची धडपड सुरू आहे. फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर आणि पश्चिम रेल्वेच्या विरार – डहाणू रेल्वे स्थानकांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत अनुक्रमे १,८४१ आणि १,१५२ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली आहे. या प्रवाशांकडून लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार, फलाट येथे तिकीट तपासणीस, आरपीएफ जवान तैनात करून तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>मुंबई : वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणूक, एका डॉक्टरसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

वातानुकूलित लोकलच्या तिकिटाचे दर कमी केल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत विनातिकीट किंवा सामान्य लोकलचे तिकीटधारक वातानुकूलित लोकलमधून प्रवास करीत आहेत. अनेक वेळा विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमध्ये बसून आणि तिकीटधारक प्रवासी उभ्याने प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येते. असाच प्रकार प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणीत घडतो. परिणामी, तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वेकडून ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात सोमवारी ७९ तिकीट तपासनीस आणि १९ आरपीएफ जवान तैनात होते. त्यांनी १,८४१ विनातिकीट प्रवाशांना पकडले. या प्रवाशांकडून दंडापोटी पाच लाख ५९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येक तिकीट तपासनीसाने सुमारे २३ विनातिकीट प्रवाशांना पकडून मध्य रेल्वेला सुमारे ७ हजार रुपये महसूल मिळवून दिला. पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विभागात सोमवारी ३३० तिकीट तपासनीसांनी १,१५२ विनातिकीट प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून तीन लाख २० हजार ९८५ रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वारंवार ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबवल्याने तिकीट विक्रीत वाढ होत आहे, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest session of passengers traveling without tickets at central and western railway stations mumbai print news amy