मुंबई : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात उतरून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिद्दीने ३६ वर्षांची सेवा पूर्ण करून, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव निवृत्त होणार आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय रेल्वेतील १ हजार ६०० हून अधिक महिला लोको पायलट कार्यरत आहेत. महिलांच्या भावी पिढीसाठी त्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.
साताऱ्यातील सुरेखा यादव यांचे शालेय शिक्षण सेंट पॉल स्कूलमध्ये झाले. लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पार पडले. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका घेतली आणि १३ फेब्रुवारी १९८९ मध्ये रेल्वेच्या नोकरीत रुजू झाल्या. भारतीय रेल्वेमधील अनेक टप्पे गाठून आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांना सन्मानित करण्यात आले.
सहाय्यक लोको पायलट – ०१.०३.१९८९ ते २८.०२.१९९५
लोको पायलट (शंटिंग) – ०१.०३.१९९५ ते १९.०८.१९९६
लोको पायलट (मालवाहतूक) – २०.०८.१९९६ ते ०६.१२.१९९९
मोटरमन (मोटरवुमन) – २६.०३.२००० ते ०२.०३.२०१०
लोको पायलट (घाट) – ०३.०३.२०१० ते १८.०५.२०१०
लोको पायलट (मेल/एक्सप्रेस) – १८.०५.२०१० ते आतापर्यंत
भारतीय रेल्वेमधील सर्व प्रकारची रेल्वे वाहतूक करणाऱ्या
सुरेखा यादव पहिल्या महिला ठरल्या
पहिल्या महिला सहाय्यक लोको पायलट
पहिल्या महिला लोको पायलट (वस्तू)
पहिल्या महिला मोटरमन (ईएमयू सेवा)
कसारा-इगतपुरी घाट विभागात पहिली महिला लोको पायलट
पहिल्या महिला लोको पायलट (मेल/एक्सप्रेस)
प्रतिष्ठित डेक्कन क्वीन (सीएसएमटी-पुणे, ०८.०३.२०११) चे पायलट करणारी पहिली महिला
पुष्पक एक्सप्रेसचे पायलट करणारी पहिली महिला (सीएसएमटी-इगतपुरी, ०८.०३.२०२०)
वंदे भारत एक्सप्रेसचे पायलट करणारी पहिली महिला (सोलापूर-सीएसएमटी, १३.०३.२०२४)
पुरस्कार आणि सन्मान
सुरेखा यादव यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी आणि अग्रणी भूमिकेसाठी राष्ट्रीय आणि संस्थात्मक पातळीवर मान्यता मिळाली आहे.
जिजाऊ पुरस्कार (१९९८), महिला अचिव्हर पुरस्कार (२००१), राष्ट्रीय महिला आयोग, दिल्ली (२००१), एसबीआय प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार (२००३-२००४), सह्याद्री हिरकणी पुरस्कार (२००४), प्रेरणा पुरस्कार (२००५), रेड स्वस्तिक, मुंबई द्वारे सारथी पुरस्कार (२००७), मध्य रेल्वे महिला अचिव्हर पुरस्कार (२०११), जनरल मॅनेजर पुरस्कार (२०११, २०१७), आरडब्ल्यूसीसी सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार (२०१३), मुख्य विद्युत अभियंता पुरस्कार (२०१५), आदी अबादी पुरस्कार (२०१६), महिला अचिव्हर पुरस्कार, महिला विंग सीसीआय अमरावती (२०१७), भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून ”प्रथम महिला पुरस्कार” (२०१८)
३६ वर्षांहून अधिक काळ सेवा करताना, सुरेखा यादव यांनी रूढीवादी कल्पना मोडून काढल्या आहेत. रेल्वे कामकाजात महिलांसाठी मार्ग मोकळा केला आहे. पहिल्या महिला सहाय्यक लोको पायलट होण्यापासून ते डेक्कन क्वीन, राजधानी एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या भारतातील प्रतिष्ठित गाड्यांचे सारस्थ करण्यापर्यंत, त्यांनी सातत्याने व्यावसायिकता, अचूकता आणि सुरक्षिततेचे उदाहरण दिले आहे.