मुंबई : २२१ वर्षांची परंपरा असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’च्या (मुंबईच्या ) येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारयादी सोमवारी जाहीर करण्यात आली. मार्च पर्यंतचे ३१२४ जुने आणि ३ ऑक्टोबर पर्यंतचे ३५५ नवे सभासद असे एकुण ३४८० सभासद यावेळी मतदानास पात्र ठरले आहेत. शनिवारी दुपारी दीड ते साडेसहा पर्यंत मतदानाची वेळ असून त्याबाबतची माहिती पात्र मतदारांना मेलद्वारे कळवण्यात आल्याचे संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया यांनी सांगितले.
३ ऑक्टोबरपर्यंतच्या ज्या सभासद अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे, ते यावेळी मतदानाला पात्र असतील, असे आदेश धर्मादाय आयुक्त यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सुधारीत मतदार याद्या तयार कराव्या लागल्या. मतदान करण्यासाठी सभासदाला संस्थेने दिलेले ओळखपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे ओळखपत्रासाठी सध्या ‘एशियाटिक’च्या कार्यालयामध्ये गर्दी उसळली आहे.
संस्थेच्या ‘दरबार दालना’मध्ये मतदानाचे टेबले लावली जाणार आहेत. मतदानाला यावेळी गर्दी होणार असल्याने सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्त मागवला आहे. संस्थेचे जुने सभासद गिरीधर शेट्टी हे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.
मार्च नंतर १६८५ नव्या सभासदांची नोंदणी झाली आहे. त्या सर्वांना संस्थेचे सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. मात्र धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णयानुसार ३ ऑक्टोबर पर्यंतचे सभासद मतदानाला पात्र ठरवण्यात आल्याने १३३० नवे सभासद ८ नोव्हेंबरच्या मतदानास मुकणार आहेत. त्यामध्ये बहुतांश महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पाठिराख्यांचा समावेश आहे. कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धे या काँग्रेस व भाजपच्या माजी राज्यसभा खासदारांमध्ये यावेळी अध्यक्षपदासाठी सामना होत आहे. १९ जागांसाठी एकुण ४५ उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अध्यक्षपदाचे उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे नेतृत्व करत असलेल्या गटामध्ये भाजप व उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्ते, अभ्यासकांचा भरणा आहे. या गटाने प्रचाराचा प्रारंभ केला आहे. सर्वच्या सर्व १९ जागांवर या गटाने उमेदवार उभे केले आहेत. एशियाटिक सोसायटीची कार्यप्रणाली वाढवण्यासाठी वचनबद्ध आणि ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनाने प्रेरित असलेल्या समर्पित अभ्यासक-कार्यकर्त्यांचे हे पॅनेल आहे, असा प्रचार सहस्त्रबुद्धे गटाकडून करण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजुला अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी गटाने धर्मादाय आयुक्तांनी सभासदासंदर्भात दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. हा गट गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात आयुक्तांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.
