महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नावाने व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून अनोळखी व्यक्तीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका कार्यकारी अभियंत्याने निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिंघल यांच्या बनावट खात्याचा वापर करून आरोपींनी अनेकांना संदेश पाठवल्याची माहिती तक्रारदार अभियंत्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीने आता त्याच क्रमांकावरून तेलंगणातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे छायाचित्र व नावाचा वापर करून खाते तयार केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : खड्ड्यांच्या प्रकरणाची सुनावणी आता विशेष खंडपीठासमोर
तक्रारदार नितीन काळे हे महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कामाला आहेत. ते वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयात कार्यरत आहेत. ३ ऑगस्ट रोजी काळे कार्यालयात गेले असता त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संदेश आला. त्या प्रोफाईलवर सिंघल यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता. त्या संदेशात आपल्याला तात्काळ पैशांची आवश्यकता असून ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. काळे यांना संशय आल्यामुळे त्यांनी संंबंधीत क्रमांकावर दूरध्वनी केला.
त्यावेळी समोरच्या व्यक्तीने दूरध्वनी बंद केला. त्यावेळी काळे यांनी संदेशाचे छायाचित्र घेऊन ते एका व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्यावेळी ग्रुपमधील काही व्यक्तींनी आपल्यालाही असा संदेश आल्याचे सांगितले. त्यामुळे सिंघल यांच्या नावाने कोणीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे काळे यांच्या लक्षात आले. त्यानंतर काळे यांनी याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, प्राप्तीकर विभागाचे प्रमुख, अनेक सनदी अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याही नावाने फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत.