मुंबई : सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर नावाजलेल्या जोडीचे रसिकांना जसे विशेष कुतूहल असते, तितकेच किंबहुना त्याहून अंमळ अधिकच उत्कंठा अभिनयाच्या क्षेत्रात आपापल्या स्वतंत्र शैलीसाठी गाजलेल्या वास्तवातील कलावंत जोडप्याचे एकत्र सादरीकरण पाहताना जाणवते. टोकदार वैचारिक भूमिका आणि खणखणीत अभिनय यासाठी नावाजलेले अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदाच एका नव्या कोऱ्या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी एकत्र आली आहे. या जोडीचा स्वरचित असा विशेष प्रयोग आणि रसिक यांच्यातील दुवा सांधण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ हे निमित्त ठरले आहे.

मराठी संस्कृतीच्या श्रीमंतीचा सौंदर्योत्सव अनुभवण्याची अनुपम संधी येत्या ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ने देऊ केली आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृह, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये काही विशेष रचित नव्या प्रयोगाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. हिंदी-मराठी चित्रपट, वेबमालिकांमधून आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर ‘नटरंग’ अशी दाद मिळवणारे अभिनेते अतुल कुलकर्णी आणि नाटक, चित्रपट, ओटीटी या सर्व माध्यमांतून चोखंदळ भूमिका करणाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांचा पहिलावहिला एकत्र प्रयोगही अशाच नव्या, अभिनव प्रयोगांपैकी एक. दोघांच्याही अभिनयाचा बाज वेगळा, त्यांची नाट्य-चित्रपट क्षेत्रातील आजवरची वाटचालही भिन्न राहिली आहे. मात्र, हे दोघेही अभिनयापलीकडे शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. गीतांजली कुलकर्णी यांनी मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी नाटक, नाट्य कार्यशाळांचा खुबीने वापर केला आहे.

आपापल्या क्षेत्रातील हिमशिखरांसारखे असलेले हे कलावंत जोडपे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर काहीतरी भन्नाट कलाकृती घेऊन येणार आहे. अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांचा हा नवा कोरा प्रयोग नेमका काय असेल? अभिवाचन, नाट्यकृती की यापेक्षा काहीतरी वेगळे… या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. या आणि अशा कार्यक्रमांची वेळ, स्थळ, दिवस, मोफत प्रवेशिका, नावनोंदणी आदी तपशील याच ठिकाणी येत्या काही दिवसांत. त्यासाठी वाचत रहा दै. लोकसत्ता.

मुख्य प्रायोजक : सारस्वत को-ऑप बँक लिमिटेड

सहप्रायोजक : केसरी टूर्स

पॉवर्ड बाय पार्टनर : कौटिल्य मल्टिक्रिएशन