मुंबई : वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पात काही मच्छीमार बाधित होत आहेत. या मच्छीमारांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मोबदला दिला जाणार आहे. हा मोबदला मिळवण्यासाठी संबंधित मच्छीमारांना अर्ज सादर करण्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता यासाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता मच्छीमारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

वांद्रे-वरळी सागरी सेतूचा वांद्रे-वर्सोवा दरम्यान विस्तार करण्यात येत आहे. या १७.१७ किमी लांबीच्या सागरी सेतूचे काम सध्या एमएसआरडीसी करीत आहे. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हा सागरी सेतू सेवेत दाखल झाल्यास नरिमन पॉईंट ते वर्सोवा अंतर काही मिनिटात पार करता येणार आहे. या प्रकल्पात काही मच्छीमार बाधित होत आहेत. त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

तसेच योग्य मोबदल्याची त्यांनी मागणी केली आहे. काही निकषांद्वारे मच्छीमारांच्या मोबदला देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार मच्छीमारांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी बाधित मच्छीमारांकडून अर्ज सादर करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बाधित मच्छीमारांना अर्ज सादर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी संपुष्टात आली. मात्र अनेक मच्छीमारांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही. अशा मच्छीमारांना एमएसआरडीसीने दिलासा दिला आहे. अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता बाधित मच्छीमारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मच्छीमारांच्या संघटनांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले.