मुंबई : बेस्ट उपक्रमाने अपंगांचा प्रवास सुकर व्हावा या हेतूने एकमजली बसमध्ये व्हीलचेअसरसह चढण्यासाठी बसविलेल्या यंत्रणेचा वापरच होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, अनेक वाहक व चालकांना प्रशिक्षण नसल्याने अपंगांना या यंत्रणेद्वारे बसमध्ये प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप अनेक करण्यात येत आहे.

नुकतेच एका व्हीलचेअरवरील अपंग तरुणीला बसमध्ये चढण्यासाठी सहाय्य न केल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर फिरू लागली आहे. बसमधील ही यंत्रणा धूळखात पडली असून यंत्रणेचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील टाटा कंपनीच्या ३४० बसमध्ये व्हीलचेअरवरील अपंगांना चढण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे. अपंगांचा सार्वजनिक प्रवास आरामदायी व्हावा, या हेतूने बसमध्ये ती यंत्रणा बसविण्यात आली आहे. सुरुवातीला मोठा गाजावाजा करीत ही यंत्रणा सेवेत आणली.

मात्र, सद्यस्थितीत या यंत्रणेचा फारसा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वेळा बस चालक बसगाड्यांच्या फेऱ्या पूर्ण करण्याच्या घाईत सामान्य प्रवाशांसाठीही बस थांबवत नसल्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यातच अपंग प्रवाशांनाही या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे समोर आल्याने बेस्ट उपक्रमाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अनेक वेळा वाहक – चालकांकडून व्हीलचेअरवरील अपंगांना बसमध्ये चढण्यासाठी बसवलेली यंत्रणा बंद असल्याचे सांगितले जाते. तर, अनेक चालक-वाहकांना यंत्रणेचा वापरच करता येत नाही. त्यामुळे अपंगांना ते थेट नकार देत असल्याचे समजते. वर्दळीच्या वेळी अपंगांना बसमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे या यंत्रणेचा वापर होत नसल्याने बसमधील जागाही अडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पैसे खर्च करण्यापूर्वी या बाबींचा विचार प्रशासनाने केला की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

ग्रॅन्ट रोडमधील नाना चौकात नुकताच एका अपंग तरुणीला प्रवेश देण्यात न आल्याचे समोर आले आहे. ती तरुणी बराच वेळ बस थांब्यावर उभी राहून बसची वाट पाहात होती. तीन बस थांब्यावर न थांबता निघून गेल्यांनतर चौथ्या बसचा व्हिडीओ काढण्याचा निर्णय तरुणीने घेतला. त्यानंतर आलेल्या चौथ्या बस चालकाने गाडी थांबवली. मात्र, त्यांना यंत्रणेचा वापर कसा करावा याची माहिती नसल्याने तरुणीला बसमध्ये चढता आले नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत सोयी उपलब्ध केल्या असल्या तरी त्याबाबत चालक – वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचा आरोप या तरुणीने केला.

बेस्टमध्ये व्हीलचेअरवरील व्यक्तीला घेण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा कशी वापरायची याचे प्रशिक्षण कंत्राटदारांच्या वाहनचालकांना देण्यात आले आहे. मात्र, ती यंत्रणा वापरायला दहा ते पंधरा मिनिटे लागतात. तसेच, वाहतूक कोंडीच्या वेळी त्या यंत्रणेचा वापर करणे शक्यच नसते, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी अनेक वेळा बेस्ट बसमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुतांश वाहकांनी संबंधित यंत्रणा बंद असल्याचे सांगत प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जाते. तर काही जण ही यंत्रणा वापरताच येत नसल्याचे सांगतात. त्यामुळे आता स्वतःची मोटारगाडी घेऊन प्रवास करतो. अनेक मित्र टॅक्सी, रिक्षाचा वापर करतात. – राहुल रामुगडे (कर्णधार, मुंबई इंडियन व्हीलचेअर क्रिकेट टीम).