मुंबई: बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या बहुचर्चित निवडणूकीच्या निकालासाठी बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला असून मंगळवारी उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या निवडणूकीत ठाकरे बंधू विरुद्ध आमदार प्रसाद लाड अशी प्रमुख लढत होत असून दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दोन्ही गटांकडून आपलाच विजय झाल्याचा दावा समाजमाध्यमांवरून केला जात होता.

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली. भर पावसाताही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल ८३ टक्के मतदान झाले. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणूकीची रंगीत तालीमच समजली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे बेस्टच्या कामगारांबरोबरच राजकीय वर्तुळाचे आणि ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचे व भाजपच्याही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

बेस्ट उपक्रमाची सर्व आगरे आणि बेस्टची कार्यालये अशा ३५ केंद्रावर ही निवडणूक पार पडली. पतपेढीच्या १५,१२३ सभासदांपैकी १२,६५६ सभासदांनी मतदान केले. मंगळवारी वडाळा आगारात सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार होती. मात्र पावसामुळे मतमोजणी करणारे अधिकारी वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात दुपारी दोन वाजल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. एकूण ३५ केंद्र आणि दीडशे उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांवरच्या या मतमोजणीला खूप विलंब झाला. रात्री ९ वाजेपर्यंत १५ आगारांची मतमोजणी पार पडली होती.

दरम्यान, मतमोजणीला विलंब झालेला असला तरी शिवसेना (ठाकरे) गटाकडून मात्र सर्व जागांवर विलंब झाल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर पडू लागल्या होत्या. त्यामुळे ठाकरे बंधूंचे अभिनंदन करणाऱ्या पोस्टही मोठ्या प्रमाणावर फिरत होत्या. तर दुसरीकडे आमदार प्रसाद लाड यांच्या गटाकडून मात्र ठाकरे यांची कामगार सेना पिछाडीवर असल्याचे दावे केले जात होते. मतमोजणीचे कल पाहता खरी लढत प्रसाद लाड यांचे पॅनेल आणि शशांक राव यांचे पॅनेल यांच्यातच सुरू असल्याची चर्चा आहे. तर ठाकरे यांचे पॅनेल हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचाही दावा लाड यांच्याकडून केला जात होता. त्यामुळे ही मतमोजणी देखील क्षणोक्षणी उत्कंठावर्धक होत होती.

आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. तर शिवसेनेने (ठाकरे)देखील आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. निवडणूकीच्या आधीच संचालक मंडळाला आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्यामुळे आधीच ठाकरे यांचे पॅनल वादात सापडले होते. तर लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा पॅनलने पैशाची पाकिटे वाटल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीची ही निवडणूक चांगलीच गाजली आहे.