मुंबई : सेवा निवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना बढती देवून बक्षिसी दिली जाते, परंतु उपक्रम तोट्यात असल्याचे कारण दाखवून वाहतूक विभागातील, परिवहन अभियांत्रिकी विभागतील आणि विद्युतपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बढती नाकारली जाते, असा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला आहे. अधिकाऱ्यांना बढती देताय, मग कामगारांनाही द्या, अशी मागणीही संघटनेने केली आहे. आता माघार नाही, पाठपुरावा करणारच, जोवर कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे.
सेवा निवृत्तीला जेमतेम १५ दिवस शिल्लक असताना बेस्ट उपक्रमात एका अधिकाऱ्याला उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक पद सोडून आणखी वरच्या पदावर अशी (जंपिंग) बढती देण्यात आली आहे. सेवा निवृत्तीला पंधरा दिवस शिल्लक असताना दिलेल्या या बढतीमुळे बेस्टच्या तिजोरीवर भार येणार आहे. त्यामुळे बेस्टमधील दोन मोठ्या कामगार संघटनांनी या बढतीला विरोध केला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) बेस्ट कामगार सेनेने आणि खासदार नारायण राणे यांच्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेनेही या अधिकाऱ्याच्या बढतीला विरोध केला आहे. या दोन्ही संघटनांनी बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या बढतीला विरोध केला आहे. कामगार सेनेने मंगळवारी बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व अधिकाऱ्यांना जशी बढती दिली तशी कामगारांनाही द्या, पदभरती करा, अशी मागणी केली. यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी या विषयावर बेस्ट उपक्रमाचे कर्मचारीय विभागाचे वरिष्ठ कर्मचारीय व्यवस्थापक सुशील पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यास सांगितले.
बेस्ट उपक्रमात मुख्य व्यवस्थापक पदावर असलेले डॉ. राजेंद्र पाटसुते या अधिकाऱ्याला सेवा निवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली. कामगारांना बढती देताना बेस्टच्या आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे केले जाते, मात्र अधिकाऱ्यांना कशी बढती दिली जाते, असा सवाल कामगार संघटनांनी केला आहे. याविषयावरून सध्या बेस्ट उपक्रमातील वातावरण तापले आहे. दरम्यान, महाव्यवस्थापकांनी दिलेल्या निर्देशानुसार कर्मचारीय विभागाने सकारात्मक चर्चा करून सर्व विभागातील विभागप्रमुखांना त्याबाबत योग्य निर्देश देण्यात येतील, ज्या ठिकाणी शक्य असेल त्याठिकाणी बढती धोरण राबविले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे सुहास सामंत यांनी सांगितले.
कामगारांना कोणती आश्वासने दिली…
ग्राहकसेवा विभागातील मीटरवाचक, बिल मेसेंजर इत्यादी पदे भरण्याकरिता एक-दोन दिवसात परिपत्रक काढण्याचे कर्मचारीय विभागाने मान्य केले. येत्या काही दिवसात ही पदे भरण्यात येतील.
वाहतूक विभागातील बस प्रवर्तक, लेखानिक, बस निरीक्षक या रिक्त पदाकरिताची पदोन्नती सुरू करण्यात येईल. याबाबत संबंधित विभागप्रमुखांकडून सूचना मागविण्यात येतील.
परिवहन अभियांत्रिकी विभागातील महाकार्यदेशक, कार्यादेशक, स.कार्यदेशक सर्व प्रकारचे टेक्निकल ट्रेडस्मन यांना वर्षांनुवर्षे प्रभारी पद दिले जाते. त्याऐवजी त्यांना या पदावर कायम करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत व सरचिटणीस रंजन चौधरी यांनी केली.
दरम्यान, बेस्टमध्ये अशा पद्धतीने सेवा निवृत्ती जवळ आलेली असताना बढती देण्याची पद्धत असून ती नियमानुसार असल्याचा दावा बेस्टच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या बढतीबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.