मुंबई : बेस्ट उपक्रमात मंगळवारी नवीन १५७ बसगाड्या दाखल झाल्या असून मोठा गाजावाजा करीत बेस्ट उपक्रमाने लोकार्पण सोहळा केला. मात्र बेस्ट उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी कधी देणार असा सवाल निवृत्त कर्मचारी करू लागले आहेत. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली असून संचित तोटा वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांना देणी कधी मिळणार असा सवाल निवृत्त कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. सन २०२२ पासून आतापर्यंत निवृत्त झालेल्या सुमारे साडेचार हजार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचारी आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी वारंवार बेस्ट कार्यालयाचे खेटे घालत आहेत.

बेस्टच्या परिवहन व वीजपुरवठा या दोन्ही विभागांचा एकूण संचित तोटा ९ हजार कोटींच्या पुढे गेला आहे. बेस्ट उपक्रमाने घेतलेल कर्ज, नुकसान, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि इतर प्रलंबित रक्कमेचा या संचित तोट्यात समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी ही एकत्रित तोट्याची रक्कम ६४०० कोटी इतकी होती. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) बेस्टचा वार्षिक तोटा जवळपास २२०० कोटींवर पोहोचला आहे. तरी आवश्यकतेनुसार लेखापत्रात एक लाखांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. बसचा घटता ताफा आणि दररोज २८ ते ३० लाख प्रवाशांना सेवा पुरविण्याची जबाबदारी यामुळे बेस्ट उपक्रमासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

त्यातच मुंबईतील सुमारे दहा लाख वीज ग्राहकांना सेवा पुरविताना खासगी कंपन्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. बेस्ट उपक्रमाला आपले दैनंदिन खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार देणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांची देणी मिळणार की नाही अशी धास्ती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. तीस वर्षांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणे यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही. ग्रॅच्युइटीची रक्कम व्याजासह तत्काळ द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सरकार आणि बेस्ट प्रशासनाला इशारा दिला आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी न दिल्यामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कौटुंबिक सभासद किंवा स्वतः च्या आजारपणकारिता पुरेशी रक्कम हातात नसते, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी देशात किंवा विदेशात पाठवण्याकरिता स्वकष्टाची रक्कम हाती नसते, कोणाचे घराचे उर्वरित कर्ज फेडण्याकरिता स्वकष्टाची रक्कम हाती नसते अथवा स्वतःचे घर घेण्याकरिता स्वकष्टाची रक्कम हाती नसते, मुलामुलींची लग्नकार्यें वा तत्सम कार्यक्रम, काहींना तर न्यायालयात दावे दाखल करण्यास देखील पैसे नाहीत त्यामुळे बेस्टने कर्मचाऱ्यांची देणी लवकर द्यावी अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचार्यांनी केली आहे. तसेच इतक्या वर्षाच्या व्याजाचा विचार करता ही रक्कम मोठी होईल, असेही मत सेवानिवृत्त कर्मचारी विजय मयेकर यांनी व्यक्त केले आहे.

भाडे कमी केल्यामुळे देणी थकीत …… याबाबत बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले की, नियमांनुसार निवृत्तीनंतर ३० दिवसांत ग्रॅच्युइटी मिळायला हवी, चार वर्षे उलटूनही ती मिळालेली नाही. सन २००० पर्यंत बेस्टची आर्थिक स्थिती चांगली होती, पण नंतरच्या काळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती बिघडली. सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून बेस्टला तोट्यात ढकलले आहे. निवडणुकीच्या काळात लोकांना खूश करण्यासाठी बसभाडे कमी केले गेले, ज्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली, आणि त्या नुकसानीची भरपाई राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली नाही. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सोसावा लागत असल्याचे मतही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.