मुंबई : भांडुप येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारगाडीची काच फोडून आतील २९ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरले. याबाबत भांडुप पोलीसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भांडुपमधील टॅंक रोड परिसरात राहणारे सनी बिगानिया (३२) यांच्या मोटारीतून सोमवारी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. त्यांनी मोटारगाडी टॅंक रोड परिसरात उभी केली होती. यावेळी ते पत्नीची कर्णफुले आणि रोख चार हजार रुपये असलेली बॅग मोटारगाडीतच विसरून गेले. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यानंतर दागिने घेण्यासाठी ते गाडीजवळ पोहोचले. मात्र अज्ञात चोराने त्यांच्या मोटारगाडीची काच फोडून गाडीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला होता.

या प्रकरणी बिगानिया यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.