तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी इशारा दिला आहे. “अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. ईडीकडून चौकशी सुरु असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. यादरम्यान दुपारी ३ च्या सुमारास ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. अटक केल्यानंतर नेलं जात असताना नवाब मलिक यांनी ही लढाई अशीच सुरु राहील असं म्हटलं आहे.