भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने संजय राऊतांना टाकून दिल्याचं म्हणत आशिष शेलारांनी खोचक टोला लगावला. संजय राऊत एकटे पडले आहेत, एकलकोंडे झाले आहेत, असाही आरोप शेलारांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारने संजय राऊत यांना वाळीत टाकलं आहे. संजय राऊत एकटे पडले आहेत, एकलकोंडे झालेत. त्यांची उपयुक्तता संपल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांना टाकून दिलंय हे चित्र दुर्दैवाने महाराष्ट्राला दिसत आहे.”

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी या पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय.

“मी महाराष्ट्र अभिमानी आहे. मी महाराष्ट्राचा नेता आहे. ही महामारी आहे. या महामारीचा उगम चीनमधून झालाय. मात्र यासंदर्भात पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ऐकून मला वाईट वाटलंय,” असं राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी, “जागतिक आरोग्य संघटनेनं त्यात तथ्य मांडलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्रातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,” अशी आठवणही पंतप्रधान मोदींना करुन दिलीय.

“जागतिक आरोग्य संघटनेनं केलेलं कौतुक, न्यायालयाने दिलेले दाखले या सर्व गोष्टींचा विचार न करता महाराष्ट्र आणि मुंबईमुळे ही महामारी पसरली असं सांगणं हे महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारने केलेला अपमान आहे,” असं राऊत म्हणालेत. “ज्या डॉक्टर, नर्स, पारिचारिकांनी मरण पत्कारणाऱ्यांचा सुद्धा अपमान आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊन यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं,” असं राऊत म्हणालेत. “मतभेद एका बाजूला आहेत. पण ठपका ठेवण्याचा जो प्रयत्न झाला. चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करण्यात आला,” असंही राऊत म्हणालेत.

“सोनू सूद कोणाचे कोण होते? त्यांना राजभवानात कोणी नेलं?, त्यांना राज्यपालांच्या हस्ते सोनू सूदचा सत्कार करणारे कोण होते? त्यांचं कौतुक कोण करत होतं?, लोकांना महाराष्ट्राबाहेर पाठवणारं कोण होतं? (सोनू सूद प्रकरणात) आम्ही म्हणत होतो की थांबा घाई करु नका, तीच आमची भूमिका होती,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा : सोनू सूद लोकं बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक कोण करत होते?; पंतप्रधानांच्या आरोपानंतर संजय राऊतांचा सवाल

“यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझ्या पुरतं माझं एक मत मांडलं. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं ना! हा सरकारवर ठपका आहे,” असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारने गप्प बसू नये असं मत नोंदवलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar criticize shivsena mp sanjay raut over mva government statement pbs