मुंबई : महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गळती लागलेल्या भूमिगत बोगद्याची दुरुस्ती हाती घेतली असून दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात आले आहे. तसेच, तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावाही आटोक्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीकामांचा आढावा घेतला.

महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यामध्ये नुकतीच गळती लागल्याची घटना घडली होती. हजारो कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या प्रकल्पातील या घटनेमुळे पालिकेवर टीका झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, पालिकेने गळती रोखण्याचे काम हाती घेतले. गळती रोखण्यासाठी पॉलिमर ग्राऊटिंगच्या इंजेक्शनच्या वापर करण्यात आला असून गळती रोखण्यात पालिकेला यश आले आहे. पालिका आयुक्तांनी शुक्रवारी या दुरुस्ती कामांची पाहणी केली.

हेही वाचा…आधी गर्दी स्थानकात, नंतर रस्त्यावर!; ब्लॉकमुळे अनेक आस्थापनांकडून कार्यालयांच्या वेळेत बदल; प्रवाशांच्या अडचणीत भर

भूमिगत बोगद्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिली. यावेळी सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त चक्रधर कांडळकर आदी उपस्थित होते.