देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी राज्यांनी केंद्राकडे मदतीचा हात मागितला आहे. प्राणवायू तुटवड्याचं संकट पाहता मुंबई महानगरपालिकेनं वातावरणातील हवेतून प्राणवायू तयार करण्याऱ्या प्रकल्पांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची उभारणी लवकरच केली जाईल असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या १६ प्रकल्पातून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. या प्रकल्पांचं आयुर्मान किमान १६ वर्षे असणार आहे. त्यामुळे प्राणवायूसाठी अवलंबून राहण्याची गरज कमी होईल असं माहिपालिकेकडून देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे.
वातावरणातील हवेतून होणार प्राणवायू निर्मिती!
शहरात प्राणवायू पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.#NaToCorona
(१/२) pic.twitter.com/PF8B2c6CUS
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
या प्रकल्पात असा तयार होणार प्राणवायू
- वातावरणातील हवा शोधून पी.एस.ए. (Pressure Swing Adsorption) तंत्राचा वापर केला जातो.
- सर्वप्रथम संयंत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित केली जाते.
- त्यानंतर ती हवा शुद्ध करण्यात येते. त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्म कण वेगळे केले जातात.
- या प्रक्रियेनंतर शुद्ध झालेली हवा ‘ऑक्सिजन जनरेटर’मध्ये संकलित केली जाते.
- जनरेटरमध्ये रसायनयुक्त मिश्रणाद्वारे शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि प्राणवायू वेगळे केले जातो.
- वेगळा केलेला प्राणवायू योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून रुग्णांपर्यंत पाईपद्वारे पोहचवला जाईल.
अरेरे! नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती; २५ रुग्णांचा करुण अंत
मुंबईत मागच्या २४ तासात ७,२२१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर ९ हजार ५४१ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ८१,५३८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख २० हजार ६८४ जणांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८४ टक्के इतका आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ५२ दिवस इतका आहे. १६ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान करोना वाढीचा दर हा १.३१ टक्के इतका आहे.