मुंबई- अभिनेता जीब्रान खानच्या कॅफेमधील व्यवस्थापकाने ३४ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी व्यवस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता जिब्रान खान (३२) हा वांद्रे पश्चिम येथील २८ व्या रस्त्यावरील ज्योती सदन इमारतीत राहतो. त्याचा वांद्रेच्या माऊंट मेरी येथील बीजे रस्त्यावर ‘ग्राऊंडेड’ नावाचे कॅफे आहे. या कॅफेत २०२२ पासून अजय सिंग रावत हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. दररोज येणारे ग्राहक रोख तसेच ऑनलाईन पैसे देत असतात. जे पैसे रोख जमा होतात ते पैसे व्यवस्थापक दुसऱ्या दिवशी बॅंकेत जमा करत असतो.
असा उघडकीस आला प्रकार
या कॅफेला लागणारे विविध साहित्य विविध विक्रेत पुरवत असतात. त्याचे पैसे व्यवस्थापक देत असतो. मात्र काही दिवसांपासून त्यांना दिलेल्या मालाचे पैसे मिळाले नव्हते. १९ सप्टेबंर रोजी कॅफेच्या स्टोअर मॅनेजर प्रमोद याने ही बाब जिब्रान खान याला सांगितली. त्यावेळी अजय रावत रजेवर होता. त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी तो गावाहून आल्यावर त्याला विचारू असे ठरवले. रावत जेव्हा गावावरून परत आला आला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला.
सीए कडून तपासणी, ३४ लाखांचा अपहार
यानंतर जिब्रान खान याने आपल्या सनदी लेखापाल (सीए) ला कॅफेच्या व्यहाराचे लेखापरिक्षण करायला सांगितले. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करण्यात आले आणि धक्कादायक बाब समोर आली. मागील १ वर्षात १ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांचा व्यवसाय झाला होता. त्यापैकी रावत याने केवळ ७९ लाख ६७ हजार रुपये बॅंकेत भरले. उर्वरीत ७९ लाख रुपये न भरता हडप केले. ही फसवणूक लक्षात येताच जिब्रान याने वांद्रे पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत या काळातील पैशांचाही रावत याने अपहार केल्याचे जिब्रान याने पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात ग्राऊंडेड कॅफेचा व्यवस्थापक अजय रावत विरोधात फसवणूक केल्याबद्दल भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे जिब्रान खान?
जिब्रान खान हा अभिनेता अर्जुन फिरोज खान याचा मुलगा आहे. अर्जुन फिरोज खान यांनी ‘महाभारत’ या प्रसिध्द टिव्ही मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आपल्या नावात बदल करून त्यांनी अर्जुन फिरोज खान असे नाव बदलले होते.. जिब्रान खान याने बालकलाकार म्हणून करिअर सुरू केले. त्याने ‘कभी खुशी कभी गम’ (२००१) ‘बडे दिलवाला ‘(१९९९), ‘क्यो की मै छूठ नही बोलता’ (२००१), ‘रिश्ते’ (२००२) इत्यादी सिनेमात त्याने बालकलाकार म्हणून काम केले आहे. बी.आर. चोप्रा यांच्या टेलिव्हिजन विष्णू पुराणा या मालिकेत ‘ध्रुव’ या पात्राची भूमिका केली होती. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केली होती.