मुंबई : मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी काफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे काफील याची तेरा वर्षांनी सुटका होणार आहे.

विशेष न्यायालयाने २०२२ मध्ये अयुब याला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अयुब याने जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मंगळवारी त्याच्या याचिकेवर निर्णय देताना त्याला जामीन मंजूर केला. अयुब याच्याविरुद्धचा खटला प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता धूसर आहे. ही बाब आणि त्याचे वय लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने नमूद केले.

मुंबईतील गजबजलेल्या झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना परिसरातील एका शाळेजवळ १३ जुलै २०११ रोजी एकाच वेळी तीन बॉम्बस्फोट घडवण्यात आला होते. या बॉम्बस्फोटांमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली होती. या बॉम्बस्फोटाप्रकरणी मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या अयुब याला फेब्रुवारी २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.

विशेष न्यायालयाने २०२२ मध्ये अयुबचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या आदेशाला अयुबने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपण निर्दोष असून या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे. बळजबरीने घेतलेल्या जबाबाशिवाय आपल्याविरोधात सरकारी पक्षाकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा दावा अयुब याने जामिनाची मागणी करताना केला होता. त्याचप्रमाणे एक दशकाहून अधिककाळ तो कारागृहात असून खटला निकाली निघण्याची शक्यता नसल्याचा दावाही त्याने याचिकेत केला होता.

जामीन मंजूर करण्याचे नेमके कारण

फेब्रुवारी २०१२ मध्ये अयुब याला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो कोठडीत आहे. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी त्याच्यावर दहशतवादाचे आरोप निश्चित करण्यात आले. तथापि, मागील साडेचार वर्षांहून अधिकच्या कालावधीत सरकारी पक्षाने केवळ १६७ साक्षीदार तपासले. असून अद्याप २३३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची आहे. त्यामुळे नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अयुबचे वय आणि वयाशी संबंधित काही समस्यांनी ग्रासल्याचे नमूद करून तो जामीन मिळण्यास पात्र असल्याचे निरीक्षण खंडपीठाने आदेशात नोंदवले.

प्रकरण काय ?

इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवून आणले होते आणि संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला होता. अयुब आणि या प्रकरणातील इतर आरोपींनी इंडियन मुजाहिदीनच्या आदेशानुसार मुस्लिम तरुणांना दहशतवादी कृत्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. तसेच अयुब हा मुख्य सूत्रधार यासीन भटकळच्या संपर्कात असल्याचाही दावा केला होता.