मुंबई : पतीशी शारीरिक संबंध नाकारणे आणि त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे हे क्रौर्यच आहे. तसेच, दोन्ही घटस्फोट मागण्याची कारण असू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या घटस्फोट मंजूर करण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेला दिलासा नाकारताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
याचिकाकर्त्या महिलेचे पतीशी असलेले वर्तन हे त्याच्यासाठी क्रौर्यच आहे. ते तसेच मानले जाऊ शकते, असेही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा देताना म्हटले. तसेच, कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिकाकर्तीचा याचिका फेटाळली. कौटुंबिक न्यायालयाने उपरोक्त दोन कारणांच्या आधारे याचिकाकर्तीच्या पतीची घटस्फोटाची मागणी मंजूर केली होती. या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे, मासिक एक लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश पतीला देण्याची मागणी केली होती.
तथापि, पतीचे घर सोडून आई-वडिलांच्या घरी गेल्यावर याचिकाकर्ती त्याच्याकडे परतलीच नाही. तसेच, तिने त्याच्या कर्मचाऱ्यांसह केलेले वर्तन पतीसाठी त्रासदायकच होते, त्याच्या मित्रांसमोर त्याला अपमानास्पद वागणूक देणे हे देखील त्याच्याप्रती क्रौर्य आहे. पतीच्या अपंग बहिणीशी याचिकाकर्तीचे वर्तनही त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेदना देणारे होते, असे नमूद करून न्यायालयाने याचिकाकर्तीची याचिका फेटाळली. तसेच, जोडप्याचे नाते पुन्हा जोडले जाण्याची शक्यता नसल्याचेही ती फेटाळताना म्हटले.
वाद काय ?
या जोडप्याचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. परंतु डिसेंबर २०१४ मध्ये ते वेगळे राहू लागले. त्यानंतर, २०१५ मध्ये याचिकाकर्तीच्या पतीने पुणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. क्रौर्याच्या आधारे घटस्फोट मंजूर करण्याची मागणी केली. कौटुंबिक न्यायालयाने त्याची मागणी केली. या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्तीने अपील दाखल केले होते. तिने केलेल्या याचिकेनुसार, तिच्या सासरच्यांनी तिचा अतोनात छळ केला. परंतु, तिचे पतीवर खूप प्रेम आहे आणि याच कारणास्तव लग्न संपुष्टात आणायचे नाही. तथापि, याचिकाकर्तीने आपल्याशी शारीरिक जवळीक नाकारली, आपल्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेतला आणि आपले कुटुंबीय, मित्र आणि कर्मचाऱ्यांसमोर आपल्याला सतत अपमानस्पद वागणूक देऊन मानसिक त्रास दिला. याचिकाकर्तीचे आपल्याप्रतीचे वर्तन हे क्रौर्यच असल्याचा दावाही प्रतिवादी पतीने सुनावणीच्या वेळी केला होता.