मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर चर्चा आणि जनजागृतीसाठी रविवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ठाणे येथील येऊरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक आदिवासी क्षेत्र आराखड्यावर चर्चा करणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांनी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या आराखड्याला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरदरम्यानच्या परिसरात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान, रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक आदिवासी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी वसाहतींवर या आराखड्याचा होणारा परिणाम समजावून घेणे हा या बैठकीचा उद्देश आहे. हा आराखडा मुंबई ठाणे परिसरातील हरित क्षेत्र, आदिवासी आणि शहराच्या पर्यावरणीय संतुलनावर थेट परिणाम करू शकतो, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने २०१६ मध्ये अधिसूचना जारी करून राष्ट्रीय उद्यानालगतच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरपर्यंतचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. याचा क्षेत्रीय आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती प्रमुख म्हणून महापालिका आयुक्तांची नेमणूक केली होती. त्यानंतर पालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागाराने आराखडा सादर करून तो सार्वजनिक अभिप्रायासाठी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. दरम्यान, हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे यावर आक्षेप नोंदविता येत नसल्याची तक्रार स्थानिक आदिवासी रहिवाशांनी केली होती. त्यामुळे सरकारने मसुदा लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

बैठकीत प्रामुख्याने स्थानिक आदिवासींना या आराखड्याबाबत समजावून सांगणार आहोत. त्यांना आराखड्यातील बऱ्याच गोष्टी समजावण्यात आलेल्या नाहीत. काहींना याविषयी माहितीही नाही. – राकेश घोलप, पर्यावरणप्रेमी, आयोजक