मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर गुरुवारी छापे टाकल़े.  ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या ११ सदनिकांवर जप्तीच्या कारवाईपाठोपाठ यशवंत जाधव यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेले असताना परब यांच्यावरील या कारवाईमुळे तपास यंत्रणा ‘मातोश्री’च्या दारापर्यंत पोहोचल्याचे मानले जात़े    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानांवर ‘ईडी’ने गुरुवारी छापे घातले. सुमारे १२ तास ही कारवाई सुरू होती़. काही महिन्यांपूर्वी या केंद्रीय यंत्रणेने परब यांची चौकशी केली होती. मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या ठाण्यातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने अलीकडेच जप्ती आणली. त्यापाठोपाठ अनिल परब यांना लक्ष्य करण्यात आल्याने केंद्रीय यंत्रणांनी ‘मातोश्री’च्या भोवताली फास आवळण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते.

‘ईडी’ने शिवसेना नेतृत्वाचे विश्वासू समजले जाणारे मुंबई महानरपालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस बुधवारी बजावली होती. गेल्याच आठवडय़ात शिवसेना खासदार भावना गवळी यांनाही ‘ईडी’ने चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे समन्स बजावले होते.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना ‘ईडी’ने अटक केली. अजित पवार यांच्या बहिणींच्या निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाचे लागोपाठ तीन दिवस पडलेले छापे, अजितदादांच्या मामाने खरेदी केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ‘ईडी’ने आणलेली जप्ती, ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सुरू झालेली चौकशी यावरून केंद्रीय यंत्रणांनी आधी राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचे दिसत होत़े

राष्ट्रवादीनंतर आता केंद्रीय यंत्रणांचा संपूर्ण रोख शिवसेनेवर असल्याचे दिसते. अनिल परब आणि त्यापाठोपाठ श्रीधर पाटणकर यांच्याविरोधातही कारवाई होईल, असे भाकीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वर्तवले होते. त्यामुळेच सोमय्या हे ‘ईडी’चे प्रवक्ते असल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते.

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपचा रोख  दिसत असताना काँग्रेसचा कोणताही नेता अजून तरी केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आलेला नाही.

भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून पद्धतशीरपणे लक्ष्य केलेले असताना भाजप नेत्यांविरोधात आरोप होऊनही महाविकास आघाडीचे नेतृत्व कारवाई करीत नाही, याबद्दल शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार तसेच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना आहे. किरीट सोमय्या यांनी पैशांचा अपहार केल्याचे गंभीर आरोप संजय राऊत यांनी करूनही सोमय्या यांच्याविरोधात कारवाई करण्यास महाविकास आघाडीचे नेते का कचरतात, असा सवालही केला जात आहे.

कारवाईच्या फेऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचे नेते

  • नवाब मलिक – अटक
  • उपमुख्यमंत्री अजित पवार – बहिणींच्या निवासस्थानांवर छापे 
  • ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ – चौकशी सुरू
  • संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी
  • खासदार भावना गवळी  – चौकशीसाठी पाचारण
  • यशवंत जाधव – चौकशीला हजर राहण्याची नोटीस 
  • मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर – सदनिकांवर जप्ती
  • आनंद अडसूळ – बँक घोटाळाप्रकरणी आरोप
  • अनिल परब : ईडीकडून चौकशी आणि मालमत्तांवर छापे

मुंबई सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही.

– अनिल परब

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central system door matoshri ed raids anil parab property ysh