जळगाव:  शासन दारी येते, लोकांना लाभ देते, हे पाहून अनेकांना पोटदुखी झाली आहे. या पोटदुखीवर उपचारासाठी लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. राज्य शासनातर्फे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाचोरा येथे घेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शिंदे यांनी भाषणाची सुरुवात अहिराणीतून केली. पुढच्या टप्प्यात ‘डॉक्टर आपल्या दारी’, तसेच महिला बचत गटांना बळ देण्याचे काम शासन हाती घेणार आहे. शासनाच्या या सर्व चांगल्या गोष्टींचा धसका घेऊन विरोधक तथ्यहीन टीका करीत असून, या पोटदुखीवाल्यांनी पाटणकरांचा काढा घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. तुम्ही घरी बसलात. आम्ही लोकांच्या दारी जातोय, लोकांना मदत करतोय. तुम्ही का केली नाही मदत? तुम्हाला संधी होती. आता तुम्हाला पोटदुखी का होते, असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा >>> महिनाभरात इंडिया आघाडीत जागांचे वाटप; शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी स्तुतिसुमनेही मुख्यमंत्र्यांनी उधळली. दरम्यान, या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या निर्माणात दंगलीचा कट दिसतो आहे. यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते, तर संजय राऊत यांच्याबाबत बोलायलाच नको, असे सांगितले. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.

केळी, कापसावर प्रक्रिया उद्योगांसाठी प्रयत्न – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यात केळी व कापसावर प्रक्रिया उद्योग येत्या काळात उभे राहायला हवेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde targets uddhav thackeray in pachora ysh