मुंबई : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुका असलेल्या २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या हद्दीत आदर्श आचारसंहिता तात्काळ अंमलात आली आहे. तरीही नगरपालिका निवडणुकीवर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय राज्य सरकार वा अन्य यंत्रणांना घेता येणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मदत वाटपाचा आचारसंहिततून अपवाद करण्यात आला आहे.

नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी मतदारांवर प्रभाव पडेल, असा कार्यक्रम राज्यात कुठेही आयोजित करता येणार नाही. आचारसंहिता ही २८८ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी लागू असली तरी राज्य सरकारला कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. आयोगाच्या या भूमिकेमुळे मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरपालिकांमध्ये लोकोपयोगी कामे करता येतील. फक्त नगरपालिकांमधील मतदारांवर प्रभाव पडेल असे कार्यक्रम हाती घेता येणार नाहीत.

या काळात उमेदवारांकडून मतदारांना प्रभावित करणारा कोणताही कार्यक्रम राबविता येणार नसून पैसे तसेच दारूवाटपावर राज्य निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात लागू राहणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर पैसे तसेच दारू वाटपाच्या घटना घडत असतात. मतदारांना प्रभावित करणाऱ्या कोणत्याही बाबी आचारसंहितेच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पैसे तसेच दारूवाटपाच्य घटनांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आचारसंहिता काळात मतदारांना लाच देणे, वस्तूंचे, पैशाचे किंवा मद्याचे वाटप करणे तसेच मतदारांना धमकावणे हा आचारसंहिता भंग मानण्यात येतो. त्यामुळे अशा प्रालोभनांवर बंदी घालण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची आणि वाहनांची व्यवस्था करणे हे निवडणूक कायद्यांतर्गत गुन्हा असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांत मोबाईल नेण्यास मनाई

मतदान केंद्रांवर मोबाईल नेता येणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. मतदान केंद्राच्या इमारतीत मोबोईल नेता येईल. पण प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रात जाताना प्रवेशद्वारावरच जमा कापरा लागेल.. मतदान केल्यानंतर त्याला तो परत करण्यात येईल. मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांना याविषयीचे अधिकार राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यातून गोंधळ वाढण्याची शक्यता वर्तविली जाते.

मतदारांसाठी नवीन मोबाईल ॲप, संकेतस्थळ

मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे यासाठी नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. मतदारयादीतील आपले नाव शोधण्याकरिता http://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर तसेच ॲपवर शोधता येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती समजू शकते.

मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय

प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये तसेच मतदारांना रांगेमध्ये थांबताना त्रास होऊ नये म्हणून सावलीची व्यवस्था करण्यात येेणार आहे.काही मतदान केंद्रांना विशेष ‘गुलाबी मतदान केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गुलाबी केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस महिला असतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.