मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईत सर्वच ठिकाणच्या फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली असून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करू लागले आहेत. मात्र कुलाबा परिसरातील रहिवाशांनी मुंबई महापालिकेला कुलाबा कॉजवे परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. सात दिवसांत फेरीवाल्यांना हटविण्यात आले नाही, तर विभाग कार्यालयासमोरच दुकाने थाटण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मुंबईतील फेरीवाल्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. त्यातही सण जवळ आले की नवे फेरीवाले नवीन जागा शोधून आपला व्यवसाय थाटतात. सण संपले तरी ते तिथेच आपले बस्तान बसवतात. त्यामुळे मुंबईत फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुलाबा कॉजवे येथील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत फेरीवाल्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अनधिकृत स्टॉल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर स्टॉल्स आणि अतिक्रमणे एका आठवड्यात हटवण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी मुंबई महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून सात दिवसांची मुदत दिली आहे.

चर्चगेट, कुलाबा परिसराचा समावेश असलेल्या ए विभाग कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले आहे. कुलाबा कॉजवेवरील ५० टक्क्यांहून अधिक स्टॉल्स बेकायदेशीर आहेत आणि अतिक्रमणांमुळे पदपथावरून चालणे मुश्कील झाले आहे. अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात सात दिवसांत कारवाई केली नाही तर प्रतिकात्मक निषेध करण्यात येईल. या कालावधीत कोणतीही दृषात्मक कारवाई दिसली नाही, तर त्याचा निषेध म्हणून ए विभाग कार्यालयाच्या बाहेर स्टॉल्स थाटण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

सर्व बेकायदेशीर स्टॉल्स आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि पदपथ जनतेला चालण्यायोग्य बनवण्यासाठी त्वरित आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुलाब्यातील रहिवासी बेला शाह यांनी केली आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे दक्षिण मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशा कुलाबा मार्केट परिसर असुरक्षित बनू लागला आहे, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.