आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मराठा संघटनांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. त्यातच छावा या संघटनेने थेट आंध्र प्रदेशातील वादग्रस्त अशा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुसलमीन (एमआयएम) या संघटनेशी संधान साधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हैदराबादेतील आदिलाबाद येथील एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांना अलीकडेच धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, हे विशेष. आज, रविवारी पुण्यात होणाऱ्या संघटनेच्या बैठकीत या युतीबाबत निर्णय होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दय़ाबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन केला आहे. मात्र, त्याचे श्रेय घेण्यावरून आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम व बाळासाहेब पाटील यांची छावा या संघटनांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा वाद विकोपाला जाऊन थेट हैदराबादेतील ओवेसी यांच्याशीच युतीची मोट बांधण्याची तयारी छावा संघटनेने सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बारा बलुतेदारांमध्ये मुस्लिमही होते, त्यामुळे, दोनच दिवसांपूर्वी आमच्या काही प्रतिनिधींनी एमआयएमशी चर्चा केली असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देऊ केला असल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी दिली. मात्र याचा निर्णय पुण्यातील बैठकीत घेण्यात येणार असून त्यांच्या विचारधारणेशी आमचा संबंध नसल्याचेही पाटील यांनी तातडीने स्पष्ट केले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनात आणले तर आठ दिवसांत ते मराठा समाजास आरक्षण देऊ शकतात. मात्र त्यांनाही राजकारण करायचे आहे. साधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकू न शकणारे विनायक मेटे यांच्या मागे मराठा समाज नाही, त्यांनी या समाजाची दिशाभूल चालविली आहे.
बाळासाहेब पाटील ,
अध्यक्ष, छावा संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collision with asaduddin owaisis mim for maratha reservation