मुंबई : सीएमएमटी – नरिमन पॉईंट, मंत्रालय, विधान भवन दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून बेस्ट बससाठी प्रचंड ताटकळावे लागत आहे. बेस्टच्या बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली असून सद्यस्थितीत केवळ चार गाड्या या मार्गावरून धावत आहेत. त्यामुळे बसची वाट बघण्यासाठी लागणारा वेळ, बसमध्ये होणारी गर्दी, उभ्याने करावा लागणारा प्रवास आदींमुळे प्रवासी प्रचंड हैराण झाले आहेत. भाडेवाढ झाल्यानंतर सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांनतर आणखी त्रास वाढल्याने प्रवासी संतप्त होऊ लागले आहेत.

इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि महसुलातील तुटीचा सामना करणारे बेस्ट प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका आणि परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर मे महिन्यात भाडेवाढ केली. अचानक केलेल्या भाडेवाढीनंतर प्रवाशांना आता प्रवासासाठी दुप्पट पैसे खर्च करावे लागत आहेत. मात्र, अद्याप सुविधांमध्ये सुधारणा झालेली नाही.

सीएसएमटी स्थानकाबाहेरून सुटणाऱ्या बस क्रमांक ११५ मधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या बसमधून नरिमन पॉईंट, मंत्रालय, विधान भवन आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. शिवाय, पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक या ठिकाणी येत आहेत. असे असताना बेस्ट उपक्रमाकडून बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत केवळ चार गाड्या या मार्गावरून धावत आहेत. पूर्वी या मार्गावरून नऊ बसगाड्या धावत होत्या. मात्र, चार्जिंगसाठी काही बस आगारामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या बसमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असल्यामुळे चार बस अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. तसेच, बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना अनेक वेळा थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. वातानुकूलित बसमध्ये किमान थंड हवा मिळेल, अशी प्रवाशांना आशा असते. मात्र, अनेकदा वातानुकूलित यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांना गारेगार प्रवासापासून मुकावे लागते. तसेच, गर्दीमुळे बसमध्ये प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुरूच असतात.

भाडेवाढ करूनही पुरेशी सुविधा मिळत नसल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. पैसे दिल्यानंतर किमान बसमध्ये बसायला जागा मिळायला हवी. मात्र, गर्दीमुळे नीट उभे देखील राहता येत नाही. गर्दीतून प्रवास करताना महिलांचे प्रचंड हाल होतात, असे प्रवासी शिल्पा गावरे यांनी सांगितले.

आगारात चार्जिंगसाठी असलेल्या बसगाड्या लवकरात लवकर बस मार्ग क्रमांक ११५ वर प्रवर्तित करण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.