मुंबई: कर्नाटकातील आळंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली आहे. ८० रुपयांत मतदार यादीतून नाव वगळले जात असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विशेष तपास पथकाच्या तपासानुसार, प्रत्येक मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळण्यासाठी फक्त ८० रुपये देण्यात येत होते. एका डेटा सेंटरने तब्बल ६०१८ अर्ज दाखल करून मतदारांची नावे वगळली आणि त्याबदल्यात ४.८ लाख रुपये मिळवले असून निवडणूक आयोग कधीपर्यंत आपली जबाबदारी झटकत राहणार असा सवाल त्यांनी केला.

एसआयटी चौकशीनुसार कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्जामागे ८० रुपये डेटा सेंटर ऑपरेटरला देण्यात आले. या प्रकरणी डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत एकूण ६०१८ अर्ज करण्यात आले. त्यासाठी सुमारे ४.८ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधून हे सर्व अर्ज पाठवण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ७५ वेगवेगळे मोबाइल क्रमांक वापरण्यात आले होते. हे नंबर पोल्ट्री फार्म कामगारांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचे होते. अर्जातील मतदारांचे नाव व पत्ता चुकीचा दाखवण्यात आला होता. बऱ्याच मतदारांना त्यांच्या नावाने अर्ज केल्याचे माहितीही नव्हते. आलंदमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत फक्त २४ मतदार हे प्रत्यक्षात मतदार यादीतून हटवण्यायोग्य असल्याचे आढळले. उर्वरित ५९९४ अर्ज फसवणूक करणारे होते, असे तपासात निष्पन्न झाल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

यापूर्वी स्थानिक पोलीस व नंतर सीआयडी सायबर गुन्हे विभागाने या प्रकरणाचा तपास केला होता. त्यात मोहम्मद अश्फाक नामक स्थानिक व्यक्तीचा सहभाग आढळून आला. २०२३ च्या चौकशीनंतर अश्फाकने आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्याचे आश्वासन दिले. पण नंतर तो अचानक दुबईला पळून गेला. यामुळे एसआयटीने त्याचे इंटरनेट कॉल रेकॉर्ड तपासून, त्याच्या मोहम्मद अक्रम, जुनैद, असलम व नदीम या सहकाऱ्यांचा शोध घेतला. यापैकी मोहम्मद अक्रम व अश्फाक हे डेटा सेंटर चालवत होते, तर बाकी डेटा एंट्री ऑपरेटर होते. एसआयटीने या सर्वांचे लॅपटॉप जप्त केले. याच लॅपटॉपद्वारे मतदार हटवण्याचे अर्ज पाठवण्यात आले होते. असे असताना निवडणूक आयोग केवळ आपली जबाबदारी झटकत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.