मुंबई: पीक कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारमुळे गेल्या आठ महिन्यांत राज्यातील तब्बल १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी एक्स या समाज माध्यमातून केला. या शेतकरी आत्महत्यांसाठी राज्यातील असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार कारणीभूत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सत्तेसाठी या सरकारने भोळ्याभाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना मिळाले काय तर कर्जमाफीसाठी समिती. अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हाती आलेले पीक गेल्याने बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पण सरकारला काही देणेघेणे नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फूट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झाले आहे. शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी यांना लाज नाही. कृषी खात्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.