करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना मुंबईत एका रुग्णाचं निधन झालं आहे. मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. ६३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एच एन रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरु होते. २१ मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी त्यांचं निधन झालं.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला डायबेटिस, उच्च रक्तदाब आणि ह्दयाशी संबंधित आजार होता. करोनाची लागण झाल्याने त्यांना दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील करोनाची लागण झालेल्यांचा आकडा वाढत चालला आहे. आज करोनाचे १० नवे रुग्ण सापडले असून यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. मुंबईत सहा आणि पुण्यात चार नवे रुग्ण सापडले आहेत. यामधील पाच जणांनी परदेश दौरा केला होता. तर इतर चार जण यांच्या संपर्कात आले होते.
शनिवारी राज्यात करोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले होते. राज्यातील नवीन १२ रुग्णांमध्ये मुंबईतील आठ आणि पुण्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर यवतमाळ आणि कल्याण येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मुंबईत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी आहे. आणखी एक रुग्णाचा गुजरात प्रवासाचा इतिहास आहे. मूळचा यवतमाळचा, पण मुंबईत दाखल असलेला रुग्ण काँगोचा प्रवास करून आला आहे. कल्याण येथील रुग्ण दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तोही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षांच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आर्यलड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या एक ४१ वर्षांच्या पुण्यातील महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले.