धवल कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची कास पकडून धार्मिकदृष्ट्या उजव्या राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र आपली प्रखर उत्तर भारत विरोधी ओळख काहीशी मवाळ करून लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्याला संबोधित केले होते. या मेळाव्याचे संयोजक होते वांद्रे गर्दी प्रकरणी अटक करण्यात आली असलेले विनय दुबे हेच होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला. पण या तिन्ही पक्षांमध्ये घरोबा मात्र होऊ शकला नाही. पण याच निवडणुकीमध्ये दुबे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आपण पण राज ठाकरे यांना सोबत घेऊन कार्यक्रम केल्यामुळे त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्र सैनिक मला आपला माणूस म्हणतात असा त्यांचा त्यावेळेला दावा असला तरीसुद्धा दुबे यांना शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिदे यांनी पराभवाची चव चाखली.

उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष असलेले दुबे हे तसे मूळचे उत्तर प्रदेशातील भदोहीचे आहेत. आपलं बरंच शिक्षण मराठीत झालं असल्याचे सांगणारे दुबे हे ऐरोलीला राहतात. त्यांचा ई-कॉमर्स वेबसाईटना तांत्रिक सहाय्य देण्याचा व्यवसाय आहे. ३४ वर्षांचे दुबे हे राजकारणामध्ये तसे नवखे नाहीत. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये दुबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उत्तर मतदारसंघातून शड्डू ठोकला होता. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मागील आठवड्यातच दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून रुपये पंचवीस हजार इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द केला होता. जटाशंकर हे गेली पंचवीस वर्ष रिक्षा चालक म्हणून काम करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus vinay dubey arrest for bandra migrants gathering dhk