मुंबई : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण(आयआरडीए) येथे अधिकारी असल्याचे भासवून बंद पडलेल्या विमा योजनांमधील रक्कम मिळवून देण्याचे आमीष दाखवून शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीची अडीच कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रक्कम जमा झालेल्या बँक खात्यांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणातील तक्रारदार ६५ वर्षांच असून प्राप्तिकरासंबंधीत कामे करतात. त्यांना ५ नोव्हेंबर २०१४ रोजी व्हॉट्सअॅपवर दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण आयआरडीए येथून दिनेश चतुर्वेदी बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी बंद पडलेल्या काही विमा योजनांमध्ये पैसे भरले होते. ती रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने आरआयडीएचे ओळखपत्रही पाठवले. त्यावेळी त्याने तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेल्या सात विमा योजनांची कागदपत्रे व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवण्यासाठी सांगितली. त्यावेळी त्याने प्रक्रिया शुल्क म्हणून ४९ हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर लॉगइन करण्याची अनुमती मिळेल, असे सांगितले. ती रक्कम भरल्यानंतर काही दिवसांनी चतुर्वेदीचा पुन्हा दूरध्वनी आला. विम्याचे २४ लाख ८० हजार रुपये तक्रारदार यांना मिळणार आहे. त्यासाठी तेवढाच कर भरावा लागेल, सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्व रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन दिले.

त्यामुळे तक्रारदार यांनी चतुर्वेदी याने सांगितलेल्या बँक खात्यात २४ लाख ८० हजार रुपये जमा केले. त्यानंतर विविध कारणे सांगून आरोपींनी वर्षभरात ८१ व्यवहारांद्वारे तक्रारदार यांच्याकडून एकूण दोन कोटी ३६ लाख ५७ हजार रुपये विविध बँक खात्यांद्वारे स्वीकारली. त्यानंतर १७ मे २०२५ ला विम्याची व तक्रारदार यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले होते. पण त्यानंतरही रक्कम जमा झाली नाही. त्यावेळी तक्रारदार यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पण मोठी फसवणूक असल्यामुळे हे प्रकरण मध्य सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी नुकतीच याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी रक्कम जमा केलेल्या बँक खात्याच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.