मुंबई : ‘निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. निवडणुका येतात आणि जातात पण त्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांचं घर काचेचं असतं, त्यांनी इतरांवर दगड मारू नये’, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावरील टीकेवरून ठाकरे गटाला दिला.
शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप करण्यात आले होते. या आरोपांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गोरेगावमधील नेस्को येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, नेते रामदास कदम, खासदार रवींद्र वायकर, प्रवक्ते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कदम यांनी काळजी करू नये. निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. इतकी वर्षे मराठी माणसांसाठी त्यांनी काही केले नाही. आपल्या सरकारने मुंबईतील रस्ते काँक्रीटचे केले आहेत. येत्या अडीच वर्षांत संपूर्ण मुंबईचे रस्ते काँक्रीटचे होतील. रस्त्यांचे रिपेअरिंग होणार नाही, त्यामुळे त्यांचा पैसा बंद होईल. – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
‘सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण…’
मराठी माणसासाठी त्यांनी काहीच केले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मराठी माणसाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. जे मराठी लोक मुंबईबाहेर गेले, त्यांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण प्रत्येकाच्या हातात तो देण्याची माझी इच्छा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे. आजपर्यंत सुमारे ५ कोटी नागरिक या उपक्रमाचे लाभार्थी झाले आहेत आणि ही संख्या अजून वाढणार आहे. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्याची संधी मिळते असे ते म्हणाले.