मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता नाराज शिवसैनिक राज्यभर निदर्शने करत आहेत. शनिवारी राज्यात १० ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. या वेळी उल्हासनगरमध्ये दगडफेकीचा प्रकारही घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पुणे, नवी मुंबई, परभणी, उस्मानाबाद, सातारा, ठाणे शहर, नागपूर शहर, नांदेड, पालघर व कोल्हापूर या १० ठिकाणी शिवसैनिकांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले.   पुण्यात शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या सहकार नगर येथील कार्यालयाची तोडफोड केली. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील  बॅनरवरील छायाचित्रावर काळी शाई फेकण्यात आली. तसेच बंडखोर आमदारांविरोधात हडपसर येथे निदर्शने करण्यात आली. नवी मुंबईत व परभणी येथे एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले. उस्मानाबाद येथे आमदार तानाजी सावंत यांच्या आनंद नगर येथील कार्यालयाच्या फलकावर गद्दार म्हणून लिहिण्यात आले.   नागपूर येथील गांधी चौक येथे एकनाथ शिंदे यांच्या बॅनरला काळे फासले व ते फाडल्याचा प्रकार घडला. नांदेड येथे बालाजी कल्याणकर यांच्या घरासमोर प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून करण्यात आला.

पालघर येथील बोईसर येथे चार ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या बॅनरवरील छायाचित्रावर शाई फेकण्यात आली. गोसवाल चौक, मुकुट नाका, बिरसा मुंडा चौक व रिलीफ रुग्णालय परिसरात हा प्रकार घडला. अपहरणाची तक्रार : बंडाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार गुवाहाटी येथे असल्यामुळे त्यांचे अपहरण केल्याची लेखी तक्रार गृहमंत्री व पोलीस महासंचालक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. बंडखोरांपैकी काही आमदारांना दबावाखाली व जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. बदलापूर येथील रहिवासी असलेले सुनील बापू दुपटे यांनी ही तक्रार केली आहे.

श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयावर हल्ला

उल्हासनगर: शुक्रवारपासून राज्यभरात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांविरुद्ध ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहेत. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरातील कॅम्प दोन भागात असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाची शनिवारी दुपारच्या सुमारास चार ते पाच जणांनी तोडफोड केली.  त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstrations shiv sainiks agitations rebel mlas stone throwing ulhasnagar ysh
First published on: 26-06-2022 at 01:48 IST