मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र अनेक भागांमधील रस्त्यांलगत, नाल्याशेजारी, बाजारपेठांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येत आहे. अपुऱ्या कचरापेट्या, कचरा उचलण्यात होणारी दिरंगाई, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीचा अभाव आदी कारणांमुळे ठिकठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.

मुंबईकरांनी कररुपात महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेले लाखो रुपये स्वच्छता मोहिमेवर खर्च होत आहेत, मात्र अस्वच्छता जैसे थे आहे. परिणामी, आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. एकंदर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई व्यापार, उद्योग, वाहतूक, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आदींमध्ये आघाडीवर असली तरीही स्वच्छतेच्या बाबतीत मात्र मागेच आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छता राखण्यात महापालिकेचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छताविषयक उपक्रम राबवण्यात येतात. मात्र, त्यानंतरही अनेक भागातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. तर, अनेक वेळा नागरिकाकही सारासार विचार न करता निष्काळजीपणे कचरा रस्त्यावर टाकतात. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग दरदिवशी विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर केला जातो. तसेच रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी ‘दुसरे झाडलोट सत्र’ (सेकंड स्वीपिंग) सुरू आहे.

दरम्यान, स्वच्छतेवर भर देण्यासाठी मुंबईत ‘स्वच्छता ही सेवा २००५’ या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, अनेक ठिकाणी महापालिकेने ठेवलेले कचऱ्याचे डबे अपुरे पडत आहेत. दरम्यान, अनके ठिकाणच्या कचऱ्याच्या डब्यांची दुरावस्था झाल्याने नवीन डबे पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कुर्ला येथील नौपाडा शाळा संकुलाबाहेर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरी भागातही जागोजागी कचऱ्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. मानखुर्दमधील शीव पनवेल महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत पूर्वी कचऱ्याचे डबे होते. मात्र, मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी रस्ता रोधक उभारून परिसर बंद करण्यात आला आहे. तसेच, महापालिकेने अन्य सोय न केल्याने नागरिक थेट रहदारीच्या रस्त्यावरच कचरा टाकत आहेत.

अनेक ठिकणी कचऱ्याचे डबेच उपलब्ध नसल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत. लल्लूभाई कंपाऊंडमध्ये वेळेवर कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कांदिवलीतील रामगड बस स्थानकालगतही नागरिक कचरा टाकला असून आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहेत. गोवंडी, चेंबूर, कुर्ला, वडाळा, शीव, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरिवली, कांदिवली आदी भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

शहरात कचऱ्याची समस्या भेडसावत असून स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मुंबईत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत टप्प्याटप्प्याने स्वच्छतेची कामे केली जात आहेत. तसेच, शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नवनवीन प्रयत्न केले जातील, अशी माहिती महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.