मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ‘एमयूटीपी-३ ए’अंतर्गत पश्चिम व मध्य रेल्वेवरील १७ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निधीअभावी यापैकी १३ स्थानकांच्या विकासासाठी अद्यापही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. या स्थानकांच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीबाबत रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर (एआयआयबी) चर्चा सुरू असून लवकरच निधी मिळेल, अशी अपेक्षा एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
एमआरव्हीसीने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह चार आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवलीसह एकूण सात स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेतला होता. हा प्रकल्प एमआरव्हीसीच्या ‘एमयूटीपी-३ ए’अंतर्गत राबविण्यात येणार आहे. एमआरव्हीसीने जुलै २०२२ मध्ये १७ स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यापैकी चार स्थानकांच्या निविदेला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये नेरळ, कसारा, कांदिवली, मीरा रोड या चार स्थानकांचा समावेश असून या कामांचे आर्थिक मूल्यांकन केल्यानंतर निविदा अंतिम करण्यात आली.
या कामासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडे निधीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र निधी मिळू न शकल्याने १३ स्थानकांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली. यासंदर्भात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने बैठकाही होत आहेत. १३ स्थानकांना निधी मिळावा यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयासोबत चर्चा सुरू असून लवकरच निधीचा तिढा सुटेल. तसेच एआयआयबीकडूनही कर्ज मिळणार असून त्यानंतर लवकरच निविदाही काढण्यात येतील, असे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी सांगितले.
विकासाच्या प्रतीक्षेतील १३ स्थानके
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
हार्बर मार्ग
जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द
पश्चिम रेल्वे
मुंबई सेन्ट्रल (लोकल), जोगेश्वरी, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा
विकास काय होणार
– रेल्वे स्थानक हद्दीत जास्तीत जास्त मोकळी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न
– फलाटावर प्रवाशांना वावरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील.
– नवीन पादचारी पूल, अधिक सरकते जिने, उद््वाहक
– पादचारी पुलांना स्कायवॉक जोडण्याचा प्रयत्न व त्यात काही बदल
– तिकीट खिडक्या, खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या रचनेत बदल
– चांगली आनसव्यवस्था आणि प्रसाधनगृहे
– प्रवाशांसाठी उन्नत डेक
– स्थानकात अधिक दिवे बसवणार