छत्रपती संभाजी महाराज यांची रविवारी ( १४ मे ) ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचं नाव देण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

ट्वीट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईत कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.”

“१६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मुंबईत कोस्टल रोड होणार आहे. त्या रोडला आता छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देणार आहोत. याच कोस्टर रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारण्यात येणार आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.