भाजपाचे आमदार प्रसाद लाड कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. प्रसाद लाड हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राज ठाकरेंची भेट घेण्यामागे नेमकं कारण काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याची शक्यता आहे.

त्याचवेळी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युतीच्या दृष्टीने सुद्धा ही भेट झाल्याची दुसरी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी आता प्रखर हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचवेळी मराठीच्या मुद्यावरुनही त्यांच्या पक्षाची वेळोवेळी आक्रमक भूमिका असते. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा भाजपा-मनसे युतीच्या मार्गातील अडथळा ठरु शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात.

त्यामुळे युती झाली नाही, तरी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेसमोर प्रामुख्याने शिवसेनेचे आव्हान असणार आहे. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपा-मनसेची रणनिती असू शकते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला आणखी वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत राजकीय समीकरणे मोठया प्रमाणावर बदलू शकतात. शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेतून खाली खेचणं, हेच दोन्ही पक्षांसमोरच मुख्य लक्ष्य असेल. कारण त्यानंतरच भाजपा-मनसेचा जनाधार वाढू शकतो.