मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून जोरदार निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रवी जाधव यांनी एका कवितेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची समाजमाध्यमांवरील एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
एक यशस्वी दिग्दर्शक व निर्माता म्हणून रवी जाधव यांनी मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. रवी जाधव हे विविध राजकीय व सामाजिक घडामोडींवर आपली परखड मते व्यक्त करीत असतात. या अनुषंगाने जाधव यांनी राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात एका कवितेमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी कवितेच्या सुरुवातीलाच हिंदी भाषेची ‘सक्ती’, करावयाची ‘युक्ती’, दावून जन ‘शक्ती’ झुगारावी असे म्हणत हिंदी भाषा लादण्यावर परखडपणे भाष्य केले असून मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या सदर कवितेवर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि, हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील.
हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पध्दतीने शिकविण्यात येईल.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल, असे शालेय शिक्षण विभागाने १७ जून २०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे. त्यानंतर हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विविध संघटनांसह राजकीय पक्षांकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली असून समाजमाध्यमांवर लेखी पोस्ट, फलक व चित्रफितीच्या माध्यमातून अनेकजण व्यक्त होत आहेत.
रवी जाधव यांची कविता नेमकी काय?
हिंदी भाषेची ‘सक्ती’
करावयाची ‘युक्ती’
दावून जन ‘शक्ती’
झुगारावी!
मराठीची ‘भक्ती’
ही एकच ‘वृत्ती’
करोनी शीघ्र ‘कृती’
दाखवावी!
प्रत्येक भाषेची ‘समृद्धी’
उमगण्या लागे ‘दृष्टी’
कोवळया वयात ‘सक्ती’ नसावी!
जय मराठी. जय महाराष्ट्र.
– रवी जाधव.