मुंबई : रे रोड येथे डंपरने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत एक जण ठार, तर एक जण जखमी झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी डंपरचालक शैलेश सुरेश जैस्वाल विरोधात निष्काजीपणे डंपर चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी घटनास्थळाजवळील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने काळाचौकी पोलीस तपास करीत आहेत.

रे रोड येथे भारत पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणातील तक्रारदार मोहम्मद आशिक मोहम्मद बदुउद्दीन (२२) मूळचा बिहार येथली रहिवासी असून तो कुटुंबियांसोबत घोडपदेव परिसरात राहतो. एका कपड्यांच्या दुकानात तो कामाला असून तेथे कपड्यांचे पॅकिंग व ते इतर ठिकाणी पोहोचवण्याचे काम करतो. त्याच्यासोबत मोहम्मद जिशान मोहम्मद फकीर अन्सारी हाही तेथे कामाला होता. दोघेही शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास मालकाने सांगितले कपडे घेऊन शिवडी परिसरात गेले होते. तेथे सर्व कपडे पोहोचवल्यानंतर ते दोघेही दुचाकीवरून रे रोड येथून त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले. रे रोडमधील अल्बर्ट जंक्शन येथील भारत पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यावेळी मोहम्मद जिशान मोहम्मद फकीर अन्सारी दुचाकी चालवत होता.

धडकेनंतर दुचाकी घसरली व दोघेही खाली कोसळले. त्यावेळी आरोपी चालकाने डंपर थांबवला नाही. डंपर अन्सारीच्या अंगावरून गेला. त्यात त्यांच्या पायाला व कमरेला भागाला गंभीर दुखापत झाली. तक्रारदार अदुउद्दीनच्याही हाताला व पायाला दुखापत झाली. त्याने तातडीने अपघाताची माहिती मालकाला दिली. मालक व दुकानात काम करणारे इतर कामगार घटनास्थळी आले. त्यांनी दोघांनाही उचलून परळ येथील केईएम रुग्णालयात नेले. तेथे दोघांवरही उपचार सुरू करण्यात आले. मोहम्मद जिशानची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस केईएम रुग्णालयात पोहोचले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रारदाराकडून घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी बदुउद्दीनच्या तक्रारीवरून पोलिसांनी डंपरचालक शैलेश जैस्वाल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. आरोपी मुंबईतील शीव परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.