मुंबई : सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी इ-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, सध्या धावत असलेल्या बाइक टॅक्सी ‘गैर व्यावसायिक’ आहेत. या बाइक टॅक्सीची नोंदणी ‘व्यावसायिक’ करण्याची प्रक्रिया प्रचंड किचकट असून, चालकांना त्यासाठी आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याची खंत बाइक टॅक्सी चालकांनी परिवहन आयुक्तांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे.
राज्यात अनधिकृतपणे बाइक टॅक्सी सुरू होती. याबाबत परिवहन विभागाने कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर हजारो चालकांनी हा व्यवसाय बंद केला. अलीकडेच ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’नुसार इ-बाइक टॅक्सी सेवांसाठी किमान भाडे अधिकृतपणे मंजूर केले. त्यानंतर पुन्हा चालकांनी बाइक टॅक्सी सुरू केली. मात्र, सध्या दोन चाकी वाहनांची ‘व्यावसायिक’ श्रेणीत नोंदणी किंवा रूपांतर करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व विसंगत ठरत आहे. ही प्रक्रिया सुलभ व एकसमान न झाल्यास अनेक चालकांना पुन्हा बाइक टॅक्सी व्यवसायापासून वंचित राहावे लागेल. हे चालक अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे बाइक टॅक्सीचा व्यवसाय ठप्प झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे अपना बाइक टॅक्सी असोसिएशनचे म्हणणे आहे.
बाइक टॅक्सी चालकांसमोरील प्रमुख अडचणी
आरटीओ कार्यालयांमध्ये माहितीचा अभाव
ताडदेव, अंधेरी, ठाणे, वाशी, कल्याण, बोरिवली या आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व्यावसायिक बाइक नोंदणीच्या नवीन प्रक्रियेची माहिती नाही. त्यामुळे अर्ज नाकारले जात आहेत किंवा अर्ज प्रक्रिया लांबणीवर टाकली जाते.
कर्जावर घेतलेल्या दुचाकी
बहुसंख्य चालकांनी वैयक्तिक वापरासाठी कर्जावर दुचाकी घेतल्या आहेत. या कर्जावरील दुचाकी ‘गैर व्यावसायिक’ असल्यामुळे आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे सुमारे ७० टक्के चालकांना दुचाकीचे रूपांतर ‘व्यावसायिक’ स्वरूपात करणे शक्य होत नाही. कागदपत्रांमध्ये फरक
प्रत्येक आरटीओकडून वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी चालकाची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते, तर काही ठिकाणी दलाल अर्ज सादर करू शकतो. यामुळे प्रक्रिया गोंधळात टाकणारी, वेळखाऊ व खर्चिक आहे.
रंगा संबंधित अडचणी
वाहनांना विशिष्ट रंग देण्याची मागणी केली जात आहे. परंतु चालकांना बाइक टॅक्सी सेवा दीर्घकाळ टिकणारी असल्याचा विश्वास निर्माण होईपर्यंत अशा बदलांबाबत पुनर्विचार करावा किंवा बाइक टॅक्सी सुरळीत सुरू झाल्यावर रंगासंबंधितबाबत निर्णय घ्यावा.
परिवहन विभागाकडे प्रमुख मागण्या
सोपी, एकसमान नोंदणी प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची यादी प्रकाशित करून ती सर्व आरटीओ, तसेच संघटनांना व ॲग्रीगेटर्सना कळवावी.
कर्जावरील वाहनांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळविण्याबाबत परिपत्रक काढावे.
सर्व आरटीओंना अधिकृत प्रशिक्षण व मार्गदर्शन द्यावे, जेणेकरून चालक आत्मविश्वासाने अर्ज करू शकतील.
निश्चित कालमर्यादेत नोंदणी/रूपांतर पूर्ण होण्याची हमी द्यावी.
नवीन व रूपांतरित वाहनांसाठी आवश्यक विम्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी.