मुंबई : मेफेड्रोन (एमडी) या घातक अमली पदार्थांचा मुंबईतील प्रमुख विक्रेता असलेला फैजल शेख आणि त्याची पत्नी अलफिया शेख यांच्याशी संबंधित आठ ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभाग कार्यालयाने आज सकाळी छापे टाकले. फैजल शेख याला २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला आता चेन्नई येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
दाऊद टोळीशी संबंधित असलेला सलीम डोळा याच्याकडून तो थेट एमडी या अमली पदार्थांची खरेदी करीत होता. या व्यवहाराचा माग घेण्याचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले, असे संचालनालयाकडून सांगण्यात आले. मात्र नेमक्या आठ ठिकाणांबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. अमली पदार्थांच्या विक्रीतून आलेला पैसा हा हवालामार्गे पाठवला जात होता, असा संचालनालयाचा दावा आहे.
सलीम डोळा हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असून इंटरपोलनेही नोटिस जारी केली आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागानेही त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. मूळचा अंकलेश्वर येथील डोळा हा दाऊद टोळीशी संबंधित असून तो रासायनिक पदार्थांची विक्री करतानाच अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतला गेला. इक्बाल मिरचीनंतर अमली पदार्थाची तस्करी तो सांभाळत असल्याचा संशय आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनीही तेलंगणा तसेच वाराणसी येथील कारखान्यावर छापे टाकून ३२७ कोटी रुपये किमतीचे एमडी हस्तगत केले होते.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत राज्यातील पुणे, नागपूर या शहरात एमडी या अमली पदार्थांची विक्री सुरु होती. संपूर्ण साठा मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून पुरवला जात होता, याची मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाने गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत चार किलो एमडी हस्तगत करण्यात आले होते. हा पुरवठा थेट सलीम डोळा याच्यामार्फत मुंबईतील हस्तकांमार्फत झाल्याचे चौकशीत उघड झाले होते.
सांगली येथे एमडी बनविणारा कारखानाही उद्ध्वस्त करण्यात आला होता. या प्रकरणात अधिक चौकशीत सुरत येथील एका बनावट औषध कंपनीचे नाव समोर आले होते. अशा कारखान्यांना कच्चा माल पुरविणारा ब्रिजेश मोराबिया याला अटक केल्यानंतर सलीम डोळ्याचा मुलगा ताहिर तसेच भाचा मुस्तफा कुब्बावाला यांची नावे पुढे आली. गेली पाच वर्षे हा प्रकार सुरु होता, असेही चौकशीत स्पष्ट झाले. एमडी हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा ब्रोमो टू मोराबिया पुरवित होता. ताहिर आणि मुस्तफा यांना भारतात प्रत्यावर्तित करण्यात आल्यानंतर मोराबियाचा सहभाग स्पष्ट झाला. आपले काका सलीम डोळा यांच्या सांगण्यावरून आपण हे केले, अशी कबुली त्याने दिली.