Eid e Milad Holiday Rescheduled Date मुंबई : मुस्लीम संघटनांच्या मागणीवरून मुंबई शहर व उपनगरात ईद-ए- मिलादची सुट्टी सोमवारी देण्याचा शासकीय आदेश जारी करण्यात आला. राज्याच्या अन्य भागांमध्ये शुक्रवारीच ईदची सुट्टी असेल. या सुट्टीच्या गोंधळामुळे ठाणे, नवी मुंबईत शुक्रवारी तर शेजारील मुंबईत सोमवारी सु्टटी मिळणार आहे.
‘ईद-ए-मिलाद’ निमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी सोमवार ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. गणेश विसर्जन शनिवारी असल्याने जुलूस ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय मुस्लीम समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत झाला होता. यामुळे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी ८ सप्टेंबरला देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख व काँग्रेसचे माजी आमदार नसिम खान यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सुट्टी बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने मुंबईतील सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला.
राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाने मुंबईतील बँका व केंद्र सरकारी कार्यालये शुक्रवारी सुरू राहतील. त्याऐवजी सोमवारी बँका व अन्य शासकीय कार्यालये बंद राहतील. मुंबईच्या शेजारील ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या अन्य भागांतील बँका व शासकीय कार्यालये शुक्रवारी बंद राहतील. हा आदेश १८८१च्या परक्राम्य संलेख अधिनियमानुसार (निगोशीबल इन्स्टूमेंट ॲक्ट) ही सु्टटी देण्यात आली आहे.