मुंबई : बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव आणि आमदार प्रसाद लाड यांचे पॅनेल जिंकले. आता या पतपेढीच्या नवीन संचालक मंडळाची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती परिवहन भवन, मुख्य कार्यालय येथे पार पडली. यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव उपस्थित होते.
तब्बल ८४ वर्षांची परंपरा असलेली आणि मराठी कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेली दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची निवडणूक ऑगस्ट महिन्यात पार पडली. या निवडणुकीचा निकाल २१ ऑगस्ट रोजी लागला. यंदा ही निवडणूक प्रचंड गाजली. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप विशेषतः आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी व दोघांच्या पक्षाच्या संघटनांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती.
ठाकरे ब्रॅण्डचीही या निमित्ताने चर्चा झाली होती. मात्र ठाकरे बंधूच्या पॅनेलपैकी एकाही उमेदवाराचा या निवडणुकीत विजय झाला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचीही मोठी चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालाचा उल्लेख करीत नुकत्याच झालेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात ठाकरे ब्रॅण्ड बेस्टच्या छोट्याशा निवडणुकीतही कसा चालला नाही त्याचा समाचार घेतला. तसेच आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि कामगार नेते शशांक राव यांचे कौतुक केले होते.
सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पॅनेलमधील प्रस्थापितांना धक्का देऊन शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनल निवडून आले. या निवडून आलेल्या पॅनेलमधून आता नवीन संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी शिवाजी खरमाटे, उपाध्यक्ष पदी रोहीत केणी, मानद सचिव संजय आंब्रे, तर खजिनदारपदी दत्ता शिंदे यांची निवड करण्यात आली.
येणाऱ्या काळात बेस्टचा चेहरामोहरा बदललेला असेल – लाड
बेस्ट कामगार बांधवाला देण्यात आलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यात येणार असून, येणाऱ्या काळात बेस्टचा चेहरामोहरा बदलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सोसायटीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे, असे प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले.