मुंबई : एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी नुकताच बंद करण्यात आला असून सद्यस्थितीत त्याचे पाडकाम सुरू आहे. दरम्यान, या पुलाअभावी होणारी मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना अन्य पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केले जात आहे. त्याबाबत शीव ते भायखळा या भागातील रस्त्यांवर विविध सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, संबंधित फलक हे इंग्रजीत लावण्यात आल्याने वाहतूक पोलिसांसह एमएमआरडीएला मराठीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत मराठीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात असून मराठी एकीकरण समितीनेही याबाबत आक्षेप घेतला आहे.
वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी प्रभादेवी पूल बंद करत त्याचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, हा पूल बंद झाल्याने मुंबईकरांना अन्य मार्गांचा वापर करावा लागत असून आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. लालबाग, चिंचपोकळी पूल, आयटीसी हॉटेल व करी रोड पूल परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवास त्रासदायक होऊ लागला आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शीव ते भायखळा या भागातील रस्त्यांवर वाहतूक पोलीस व एमएमआरडीएमार्फत प्रभादेवी, वरळी या भागात जाण्यासाठी चिंचपोकळी पूल, एस पूल, तसेच सेवा रस्त्यांचा वापर करण्याबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, संबंधित फलक इंग्रजी भाषेत असून वाहतूक पोलीस व एमएमआरडीए प्रशासनाला मराठी भाषेचा विसर पडल्याचे आरोप मराठीप्रेमींकडून केला जात आहे. मराठी एकीकरण समितीने याबाबत आक्षेप घेतला असून तेथे मराठी भाषेत फलक लावण्याची मागणी समितीने केली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
एमएमआरडीएमार्फत एल्फिन्स्टन पुलाच्या आसपास फलक लावण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहतूक पोलीस फलक लावतात. त्यामुळे मराठी वगळून अन्य भाषेत फलक लावण्यात आल्याची माहिती नाही, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले.