मुंबई : भारतात ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा झपाट्याने प्रसार आरोग्य क्षेत्रासाठी मोठं आव्हान ठरू लागला आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-५ नुसार, देशातील १५ वर्षांवरील प्रौढांपैकी सुमारे २४ टक्के पुरुष आणि २१ टक्के महिलांना उच्च रक्तदाब आहे, तर ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये हे प्रमाण ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णांना त्यांच्या आजाराची कल्पनाच नसते. त्यामुळे अचानक स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा मूक्षपिंडविकारासारख्या गुंतागुंतीच्या स्थिती उद्भवत आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) २०२४ च्या एका सर्वेक्षणानुसार देशात सध्या सुमारे ३५ कोटी लोक उच्च रक्तदाबाच्या छायेत आहेत. विशेष म्हणजे यापैकी फक्त ३९ टक्के लोकांनाच आपल्याला हा आजार आहे याची जाणीव आहे, तर केवळ १५ टक्के रुग्णांचाच रक्तदाब नियंत्रणात आहे. अशा वेळी वेळेत निदान आणि सततची निगा नसेल तर ही स्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असा इशारा सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ देत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना व साऊथ इस्ट एशिया रिजनल ऑफीसच्या २०२३ च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे १७ लाख मृत्यू हाय ब्लड प्रेशरशी संबंधित आजारांमुळे होतात. त्यात हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, किडनी विकार आघाडीवर आहेत. या मृत्यूंपैकी सुमारे ५७ टक्के मृत्यू थेट हायपरटेन्शनमुळे होत असल्याचंही आकडेवारी स्पष्ट करते. दिवसेंदिवस शहरीकरण, मानसिक ताण, असंयमित आहार, झोपेचा अभाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे ही स्थिती अधिकच बळावत आहे.

मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरु यांसारख्या महानगरांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हायपरटेन्शनचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एम्स, दिल्लीने २०२५ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, तपासलेल्या कामकाजी तरुणांपैकी ३५ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणं दिसून आली. विशेष म्हणजे यापैकी बहुतेकांनी पूर्वी कधीच रक्तदाबाची तपासणी केली नव्हती. या पार्श्वभूमीवर केईएमच्या ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन सांगतात, उच्च रक्तदाबाची भीती म्हणजे फक्त वृद्धांची समस्या असा समज आता कालबाह्य झाला आहे. लहान वयातच या आजाराने ठाण मांडले असून ही एक शांतपणे पसरणारी महामारी आहे. नियमितपणे रक्तदाब तपासणी व रक्तदाबाची समस्या आढळल्यास डॉक्टरांनी दिलेले औषध नियमितपणे घेणे आवश्यक असल्याचे डॉ महाजन म्हणाले.

भारतीय आरोग्य मंत्रालयाने याच पार्श्वभूमीवर २०२३ मध्ये इंडिया हायपरटेंशन कंट्रोल इनिशिएटिव्ह नावाची विशेष मोहीम सुरू केली. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर, राज्य आरोग्य विभाग आणि एम्सच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात दोन कोटीहून अधिक लोकांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४५ लाख रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला असून त्यांना औषधे, निगा आणि समुपदेशन मोफत दिल जात आहे.

या समस्येचं आर्थिक दुष्परिणामही लक्षणीय आहे. आरोग्य मंत्रालयाच्या २०२५ च्या अहवालानुसार, भारतात हाय ब्लड प्रेशरशी संबंधित आजारांवर दरवर्षी ९०,००० कोटींपेक्षा अधिक खर्च होतो. हा खर्च केवळ औषधोपचारावर नसून स्ट्रोक, हृदयरोग, किडनी डायालिसिससाठी लागणाऱ्या सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे देशाच्या आरोग्य अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण येतो आहे. विशेष म्हणजे हाय ब्लड प्रेशरचं अनेक वेळा कोणतंही लक्षण जाणवत नाही. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी करणे, मीठाचं प्रमाण कमी ठेवणं, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान-दारूपासून दूर राहणं, तणाव नियंत्रण आणि पर्याप्त झोप हे यावरील प्रमुख उपाय आहेत.

ठाणे येथील डॉ. पराग देशपांडे म्हणतात,आजची तरुण पिढी हायपरटेन्शनच्या उंबरठ्यावर उभी आहे. ऑफिस संस्कृती, स्क्रीन टाइम वाढण, फास्ट फूड, आणि झोपेचा अभाव हे सगळं आजाराला निमंत्रण देतय. ही सवयी मोडल्या नाहीत तर आगामी काळात आरोग्याच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागेल. आरोग्य मंत्रालयाने यंदा ‘स्वस्थ रक्तदाब, सुरक्षित आयुष्य’ हे घोषवाक्य देत नव्या मोहिमेला सुरुवात केली असून, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी आणि जनजागृती शिबिरं आयोजित केली जात आहेत.

भारताला ‘युवकांचा देश’ म्हणताना आपण जर त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत राहिलो, तर ही हायपरटेन्शनची ‘शांत महामारी’ भविष्यात प्रचंड सामाजिक आणि आर्थिक संकट घडवू शकते. म्हणूनच, रक्तदाबाच मापन हे आता फक्त वृद्धांच काम न राहता तरुणांचही प्राथमिक आरोग्य तपासणी अत्यावश्यक बनली आहे.