मुंबई : पवईतील ओलीस नाट्याचा सुत्रधार रोहित आर्या याने सुमारे ३ महिन्यांपूर्वी हा संपूर्ण कट रचून त्याची पूर्वतयारी सुरू केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने संबंधिताचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. रोहितच्या मृतदेहावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत कुटुंबियांनी अद्यापही मौन बाळगले आहे.

रोहित आर्याने (५०) गुरुवारी चित्रिकरणाच्या निमित्ताने मुलांना पवईच्या आर.ए. स्टुडियोत मुलाखतीसाठी बोलावले होते. नंतर १७ मुलांना ओलीस धरले होते. यावेळी चित्रफित प्रसारित करून त्याने आपली भूमिका मांडली. सुमारे अडीत तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी केलेल्या कारवाईत रोहितचा आर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोहित आर्याविरोधात हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी कलमांअतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखा-२ आर्याच्या मृत्युचा आणि गुन्हे शाखा-८ चे पथक संपूर्ण ओलीस नाट्याच्या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

जबाब नोंदविण्यास सुरुवात

रोहितने ज्या पद्धतीने मुलांना ओलीस ठवले, लघुपटाच्या आणि सिनेमाच्या प्रकल्पासाठी नागरिकांबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली ते पाहता किमान ३ महिन्यांपूर्वी त्याने ही योजना रचली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे आत्महत्या करून काही उपयोग नाही हे रोहितला कळून चुकले होते. त्यासाठी त्याला काही तरी वेगळे करायचे होते, असे पोलिसांनी सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी त्याने आपल्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले होते. पत्नीला माहेरी अहमदाबादला पाठवले होते, तर आई वडिलांना पुण्यातील घरातून अन्यत्र नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे तपशील गुन्हे शाखेने उघड केलेले नाहीत. सध्या ६ ते ७ जणांचे जबाव नोंदविण्यात आले असून आणखी काही जणांचे जबाब नोंदवण्यात येतील, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याने या कालावधीत कुठल्याही मुलांना इजा पोहोचवली नव्हती. काही पालकांनी रोहितने मुलांच्या सुटकेच्या मोबदल्यात पैशांची मागणी केल्याचा दावा केला होता. पोलीस त्याची सत्यता पडताळत आहेत.

रोहितच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणार

रोहित आर्याने राज्य शासनासाठी केलेल्या लघुपटांच्या प्रकल्पांचे पैसे थकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रोहित कर्जबाजारी झाला होता का, त्याची आर्थिक स्थिती कशी होती हे पोलीस जाणून घेणार आहेत. त्याच्या बँकेचे तपशील मिळविण्यात येत आहे. ई-मेल तपासण्यात येणार आहेत. रोहितचा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्यातून काही सुगावा मिळतो का ते पाहिले जाणार आहे.

पुण्यात अंत्यसंस्कार, कुटुंबाचे मौन

जे.जे. रुग्णालयात रोहितच्या मृतदेहाचे शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. मात्र त्याची पत्नी मृतदेह घेण्यासाठी आली नव्हती. रात्री उशीरा त्याच्या मेव्हण्याकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु या घटनेबाबत त्याची पत्नी अथवा कुटुंबियांनी अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे रोहित वैफल्यग्रस्त होण्यामागचे गूढ वाढले आहे. रोहितच्या पत्नीची पोलीस चौकशी करणार असून त्यातून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येऊ शकेल अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.