मुंबई : रविवारी रात्री दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील बाटा शो-रूममध्ये आग लागल्याची घटना घडली. ही घटना रात्री सुमारे साडे दहा वाजता घडली. मध्यरात्री आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले असले तरी या आगीत चपला, बूट जळून खाक झाले.

खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथील ‘बाटा’ या चपला व बूटच्या दुकानाला रविवारी रात्री आग लागली. द्वारकादास या चार मजली इमारतीत बाटाचे दुमजली शोरूम आहे. त्यात ही आग लागली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम हाती घेतले होते.

सुरुवातीला अग्निशमन दलाने क्रमांक १ ची वर्दी दिली होती. परंतु थोड्याच वेळात आगीची तिव्रता वाढल्यामुळे २ क्रमांकाची वर्दी देण्यात आली. घटनास्थळी ८ फायर इंजिन, ६ जंबो टँकर, १ अँब्युलन्स, पाण्याचे टँकर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन, १ रेस्क्यू व्हॅन,१०८ रुग्णवाहीका, तसेच वरिष्ठ स्टेशन अधिकारी, स्टेशन अधिकारी आणि वॉर्ड कर्मचारी उपस्थित राहून आग विझविण्याचे काम करत होते. रात्री साडे बारा वाजता ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग बाटा शो-रूममधील साहित्यापुरती मर्यादित होती मात्र लागलेल्या आगीमुळे शेजारच्या दुकानांतून धूर बाहेर येताना दिसला. रात्रीची वेळ असल्यामुळे दुकान बंद होते व घटनेत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.