मंगल हनवते
मुंबई : म्हाडाने घरांसाठी अर्जासोबत जमा करण्याच्या अनामत रक्कमेत भरमसाठ वाढ केली आहे. पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांची अनामत रक्कम पाच पटींनी वाढविली आहे. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यल्प गटात ५ हजार रुपयांवरून थेट २५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. २० टक्के योजनेतील घरांसाठीच्या रक्कमेत दुप्पट वाढ केली आहे. यातील अत्यल्प गटाच्या घरांसाठी ५ हजारांऐवजी १० हजार रुपये भरावे लागतील.
म्हाडा सोडतीत अर्ज करण्यासाठी उत्पन्न गटाप्रमाणे ठराविक अनामत रक्कम भरावी लागते. सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना रक्कम परत केली जाते. घराच्या आशेने मोठय़ा संख्येने इच्छुक अर्जदार एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करतात. या प्रत्येक अर्जामागे अनामत रक्कम भरावी लागते. त्यामुळे पुणे मंडळाच्या सोडतीसाठी एक किंवा अधिक अर्ज करणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे मंडळाच्या ५९६६ घरांच्या सोडतीतील म्हाडा गृहप्रकल्पातील २९२५ घरांच्या तसेच पंतप्रधान आवास योजनेतील ३९६ घरांच्या अनामत रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक अशा मंडळाच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र त्याचवेळी अनामत रक्कम कमी असल्याने एकच व्यक्ती अनेक अर्ज भरते. त्यातही दलालांकडून मोठय़ा संख्येने अर्ज भरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशावेळी सोडतीत स्पर्धा वाढते आणि गरजू अर्जदार अडचणीत येतात. त्याला आळा घालण्यासाठी अनामत रक्कमेत वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोकण मंडळाचाही वाढीचा प्रस्ताव
पुणे मंडळापाठोपाठ कोकण मंडळानेही अनामत रक्कमेचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. लवकरच हा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. ही वाढ नेमके किती असेल हे अद्याप समजू शकलेले नाही. पण मुंबईनंतर इच्छुकांचा प्रतिसाद हा सर्वाधिक कोकण मंडळाच्या सोडतीकडे असतो. असे असताना कोकण मंडळाने रक्कम वाढविल्यास नाराजीचा सूर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाचा दिलासा
मुंबई मंडळाने अत्यल्प आणि अल्प गटाला मोठा दिलासा दिला आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि गटाच्या रक्कमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही. मात्र मध्यम आणि उच्च गटात वाढ होईल, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
आश्वासनावरून घूमजाव
प्राधिकरणाने अनामत रक्कम वाढविण्याचा प्रयत्न यापूर्वीच केला होता. मात्र ‘लोकसत्ता’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर प्राधिकरणाने अल्प आणि अत्यल्प गटाच्या रक्कमेत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र आता यावरून घुमजाव करत सर्व गटांसाठीची अनामत रक्कम वाढविली आहे.